साप दाखवण्यासाठी पत्नीला बाहेर बोलावले, घराबाहेर जे घडले ते भयानक
पतीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. संशयातून पतीने टोकाचे पाऊल उचलले. पत्नीला साप पाहण्याच्या बहाण्याने घराबाहेर बोलावले. मग दारुच्या नशेत जे केले ते भयंकर होते.
फतेहाबाद : चारित्र्याच्या संशयातून पतीने अपंग पत्नीचा काटा काढल्याची धक्कादायक घटना हरियाणातील फतेहाबादमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. आरोपीने साप पाहण्याच्या बहाण्याने पत्नीला घराबाहेर बोलावले. मग मारहाण करत पत्नीची हत्या केली. नराधम एवढ्यावर थांबला नाही. हत्येनंतर पत्नीचा मृतदेह सायकलला बांधून मृतदेह फरफटत नेला आणि गावातील चौपालाच्या खिडकीला बांधून तो पळून गेला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. लधुवास गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.
चारित्र्यावरील संशयातून पत्नीला संपवले
आरोपीला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. यातूनच त्याने पत्नीचा काटा काढला. बुधवारी रात्री तो दारुच्या नशेत घरी आला. यानंतर त्याने साप पाहण्याच्या बहाण्याने पत्नीला घराबाहेर बोलावले. पत्नी बाहेर येताच आरोपीने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर मृतदेह नेऊन चौपालाच्या खिडकीला बांधून तेथून पसार झाला.
आरोपीला अटक
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. पीडित महिलेच्या भावाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा नोंद करत आरोपीला अटक केले. आरोपीची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. हरभेज सिंह असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.
या घटनेमुळे गावात एकच खळबळ माजली होती. केवळ संशयातून पत्नीची इतकी क्रूर हत्या केल्याने सारेच हैराण झाले. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.