साहिबगंज : झारखंडमधील साहिबगंज जिल्ह्यात एक अमानुष घटना उघडकीस आली आहे. चटकी गावच्या जंगलात सापडलेली मानवी कवटी आणि मृतदेहाचे तुकडे याबाबत खुलासा करण्यास पोलिसांना यश आले आहे. ते तुकडे अंगणवाडी सेविका मालोती सोरेन हिच्या मृतदेहाचे असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. मालोतीची तिच्या पतीने आपल्या साथीदारांच्या मदतीने हत्या केल्याची उघड झाले आहे. तल्लू किस्कू असे आरोपी पतीचे नाव असून, पतीसह त्याच्या तीन साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. पतीच्या दुसऱ्या विवाहाला विरोध करत होती म्हणून पतीने तिचा काटा काढला.
मालोती सोरेन 27 एप्रिल रोजी तिच्या आईशी शेवटचे फोनवर बोलली होती. यावेळी तिने पती आपल्याला मारहाण करत असून, सोबत ठेवण्यास तयार नसल्याचे तिने आईला सांगितले होते. यानंतर काही दिवसांनी मालोतीचे कापलेले शीर जंगलात सापडले. पोलीस तपासात पीतवर संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आणि सर्व घटनाक्रम सांगितला.
अंघोळीच्या बहाण्याने तल्लू मालोतीला तलावावर घेऊन गेला. त्याचे मित्र तिथे आधीच होते. तल्लूने आधी पत्नीला बेदम मारहाण केली. यात ती बेशुद्ध झाली. यानंतर तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे केले आणि जंगलात फेकले. 3 मे रोजी जंगलातून मानवी कवटीसह शरीराचे 9 तुकडे सापडले होते. यानंतर तीन दिवसांपूर्वी मालोतीच्या आईने ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दिली होती.
त्याआधारे पोलिसांनी तपास केला असता जंगलात सापडलेले मृतदेहाचे तुकडे आणि मानवी कवटी मालोतीची असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. पोलिसांनी पतीसह त्याच्या तिन्ही साथीदारांना अटक केली आहे. होपना हंसदा, मंडल मुर्मू आणि नारायण मुर्मू अशी अन्य तीन आरोपींची नावे आहेत.