पती-पत्नी रात्री एकत्र दारु पित बसले होते, सकाळी गावकऱ्यांनी पाहिले तर काही भलतेच घडले होते !
पती-पत्नी दोघेही एकत्र बाजारात गेले. बाजारातून घरी आल्यानंतर रात्री दोघे एकत्र दारु पित होते. सकाळी शेजाऱ्याने पाहिले असता भयानक दृश्य समोर दिसले.
रांची : झारखंडमधील नक्षलग्रस्त खुंटी जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील तोरपा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तातीदंड टोला येथे पतीसोबत दारू पिणे पत्नीला चांगलेच महागात पडले. दारूच्या नशेत पतीने पत्नीची हत्या केल्याने एकच खळबळ उडाली. दारू प्यायल्यानंतर दोघांमध्ये काही कारणातून वाद झाला. मग हा वाद विकोपाला गेला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. पती-पत्नीमधील या वादामुळे पाच मुलं आई-वडिलांच्या प्रेमाला मुकली आहेत. बिरसी आइंड असे मयत महिलेचे नाव आहे, तर अजय आइंड असे आरोपी पतीचे नाव आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर पती अजय ऐंद रात्रभर तिच्या मृतदेहाजवळ बसून होता. सकाळी गावकऱ्यांना हत्येची माहिती पोलिसांना दिली.
आरोपी पतीला पोलिसांकडून अटक
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी टाटीडांड गावात पोहोचून मयत महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. तसेच हत्येतील आरोपी महिलेचा पती अजय आइंड याला अटक केली. पोलिसांनी घटनास्थळावरून हत्येत वापरलेले हत्यारही जप्त केले आहे. पोलिसांनी मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. पोस्टमॉर्टमनंतर महिलेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
या जोडप्याला 5 मुले आहेत. यामध्ये 3 मुले आणि दोन मुलींचा समावेश आहे. आईचा मृत्यू आणि वडिलांचा तुरुंगवास यामुळे पाच निष्पाप मुलांच्या डोक्यावरून मायेची सावली हिरावली आहे. सध्या सर्व मुले त्यांच्या काकूकडे आहेत.
क्षुल्लक वादातून पतीने पत्नीला संपवले
अजय आणि बिरसी दोघेही बाजारात गेले होते. बाजारातून परतल्यानंतर दोघेही घरात एकत्र बसून दारू प्राशन करत होते. दरम्यान, पती अजय आइंड याचा पत्नीसोबत काही कारणावरून वाद झाला. वाद इतका वाढला की, दोघांमध्ये बाचाबाची झाली. दरम्यान, रागाच्या भरात पती अजय याने पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला.