Kalyan Crime : कल्याणमध्ये पुन्हा टोळक्याचा हल्ला, गुन्हेगारीचं हॉटस्पॉट ठरतंय कल्याणमधील कोळसेवाडी?

कल्याणमध्ये गुन्हेगारी फोफावली आहे. खुलेआम गुन्हेगार दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. नागरिकांना नाहक त्रास देत आहेत. मात्र पोलीस प्रशासन गुन्हेगारी रोखण्यास कुचकामी ठरत असल्याचे चित्र आहे.

Kalyan Crime : कल्याणमध्ये पुन्हा टोळक्याचा हल्ला, गुन्हेगारीचं हॉटस्पॉट ठरतंय कल्याणमधील कोळसेवाडी?
कल्याणमध्ये अंमली पदार्थ विरोधी कारवाईत आठ जणांना अटक
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Aug 12, 2023 | 4:02 PM

कल्याण / 12 ऑगस्ट 2023 : चोरी, दरोडे, हल्ला, मारहाण, बलात्कार असा कोणता गुन्हा नाही जो कल्याण कोळसेवाडी परिसरात होत नाही. दररोज या घडणाऱ्या या घटनांमुळे कल्याण कोळसेवाडी परिसर गुन्हेगारीचं हॉटस्पॉट ठरतंय की काय असा प्रश्न पडला आहे. आज पुन्हा एकदा टोळक्याच्या मारहाणीची घटना कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. वाढती गुन्हेगारी पाहता आता पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न निर्माण झाला आहे. पत्नीसोबत रस्त्याने चाललेल्या एका व्यक्तीवर टोळक्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. त्याच्या पत्नीलाही टोळक्याने शिवीगाळ केली. यावेळी मदतीसाठी मध्ये पडलेल्या तरुणांनाही टोळक्याने सोडले नाही. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

पती-पत्नी दुचाकीवरुन जात असताना मारहाण

कल्याण पूर्वेतील चक्की नाका परिसरात तौशिब सय्यद हे आपल्या पत्नीसोबत दुचाकीने चालले होते. यावेळी तेथे टवाळक्या करत बसलेल्या 10 ते 15 जणांच्या टोळक्याने महिलेला शिवीगाळ करण्यास सुरवात केली. तर तिच्या पतीला विनाकारण मारहाण करत होते. यावेळी तेथे उपस्थित असलेले दोन तरुण त्यांच्या बचावासाठी तेथे आले. टोळक्याने त्या तरुणांनाही मारहाण करत धारदार हत्याराने हल्ला केला.

वाढती गुन्हेगारी रोखण्यास पोलीस अपयशी

याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. मात्र सतत घडणाऱ्या या घटनांवरुन पोलीसच अकार्यक्षम झाल्याचे दिसून येते. वाढती गुन्हेगारी रोखण्यास पोलीस अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. यामुळे गुन्हेगार खुलेआम दादागिरी, मारहाण करत दहशत पसरवत आहेत.