कल्याणमध्ये मंगळसूत्र चोरांचा सुळसुळाट, सायंकाळी फिरण्यासाठी जाणाऱ्या महिला टार्गेट
कल्याण शहरात गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नाही. यामुळे भररस्त्यात लूटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे महिला वर्गात भितीचे वातावरण आहे.
कल्याण : कल्याणमध्ये मंगळसूत्र चोरांचा सुळसुळाट झाला आहे. सायंकाळी फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या महिलांना टार्गेट करत चोरटे मंगळसूत्र लांबवतात. पश्चिम परिसरात तीन तासात दोन वृद्ध महिलांची मंगळसूत्र लांबवल्याची घटना घडली आहे. यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला आहे. या दोन्ही घटनेची तक्रार कल्याण खडकपाडा पोलीस आणि महात्मा फुले पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांचा धाक गायब झाल्याने चोर खुलेआम चोरी करत असल्याचे दिसून येत आहे.
वेताळवाडीत घडली पहिली घटना
पहिली घटना कल्याण पश्चिम परिसरातील वेताळवाडी येथे घडली. चिखलेबागमध्ये राहणाऱ्या अरुणा हेमंत ठमके या वृद्ध महिला बुधवारी योगिनी एकादशी असल्याने शिवाजी चौकातील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शन, भजन ऐकून संध्याकाळी साडे सात वाजता घरी निघाल्या असताना त्यांना वेताळवाडी झोझवाला संकुल येथे एका इसमाने अडवले. यानंतर आरोपीने त्यांच्या गळ्यातील 60 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावले. अरुणा यांनी चोरट्याला प्रतिवाद करताच त्याने आजींना ठार मारण्याची धमकी दिली. या झटापटीत तो मंगळसूत्र हिसकावून पळून गेला.
वाणी विद्यालयाजवळ घडली दुसरी घटना
दुसरी घटना कल्याण पश्चिमेतील वाणी विद्यालयाजवळ घडली. भोईरवाडी भागात राहणाऱ्या प्रा. डॉ. संगीता श्रीकांत पांडे या आपल्या सुनेसह रात्री जेवण झाल्यानंतर फिरायला गेल्या होत्या. वाणी विद्यालय येथून पायी जात असताना वाधवा सभागृहासमोरील रस्त्यावर अचानक दुचाकीवरील दोन जण प्रा. डॉ. पांडे यांच्या दिशेने आले. काही कळण्याच्या आत दुचाकी स्वाराच्या मागे बसलेल्या इसमाने पांडे यांच्या मानेवर जोराची थाप मारुन त्यांच्या गळ्यातील 45 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. अचानक मानेवर फटका पडल्याने घाबरुन त्या जमिनीवर पडल्या. त्यांना दुखापत झाली आहे.