सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण : पत्नीने दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून पतीने बेदम मारहाण केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. कल्याण शीळफाटा रोडवरील काटई गावात ही घटना घडली. प्रतिक्षा चौधरी असे पीडित महिलेचे नाव असून, तिच्यावर शास्त्रीनगर पोलीस ठाण्यात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सागर चौधरी, रमेश चौधरी, जिजाबाई चौधरी, शरद चौधरी आणि रेणुका चौधरी अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. यानंतर सासरच्या मंडळींनी प्रतिक्षाच्या माहेरच्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
प्रतिक्षा घरातच ज्वेलरीचा व्यवसाय करते, तर तिचा पती सागर हा केबलचा व्यवसाय करतो. प्रतिक्षा हिचा पती सागर चौधरी याला दारुचे आणि बैलगाडा शर्यतीचे व्यसन आहे. मिळणारा पगार तो बैलगाडा शर्यत आणि दारुवर उधळीत असे. रविवारी सागर दारुच्या नशेत घरी होता. त्याने पत्नीला आवाज देऊन आधी पिण्यास पाणी मागितले, मग दारुसाठी पैशाची मागणी केली. यावेळी पत्नीने आपल्याकडे दारुसाठी पैसे नाहीत असे सांगताच त्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली.
पतीने मारहाण केल्याचे प्रतिक्षाने आपल्या वडिलांना सांगितले. यानंतर प्रतिक्षा घरात एका कोपऱ्यात बसून वडिलांची वाट पाहत होती. यावेळी सासू-सासरे, दीर आणि जावेनेही तिला शिवीगाळ आणि मारहाण केली. प्रतिक्षाचे वडील घरी आले तर प्रतिक्षा जखमी अवस्थेत दिसली. त्यांनी तात्काळ मुलीसह मानपाडा पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी पतीसह सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. महिला जखमी असल्याने पोलिसांनी तात्काळ तिला उपचारासाठी शास्त्रीनगर रुग्णालयात पाठवले. सासरची मंडळींनी प्रतिक्षा हिच्या माहेरच्या लोकांवर हाणामारी केल्याची तक्रार दाखल केली आहे.