शेतकऱ्यांची तब्बल ‘इतक्या’ कोटींची फसवणूक, आतापर्यंत 445 गुन्हे दाखल
उसतोड मुकादमांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. याबाबत गुन्हे दाखल करण्याची मागणी स्वाभिमानी संघटना वारंवार करत होती. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विशेष मोहिम राबवली होती.

कोल्हापूर : ऊसतोड मुकादमाकडून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची 34 कोटींची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी 31 पोलीस ठाण्यात 445 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ऊसतोड मुकादमांनी केलेल्या फसवणुकी विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. पोलिसांनी 19 ते 25 मे दरम्यान राबवलेल्या या मोहिमेत चारशे अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ऊसतोड मुकादमाकडून शेतकऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या फसवणुकीबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी स्वाभिमानी संघटनेने केली होती.
फसवणुकीचे गुन्हे उघड करण्यासाठी पोलिसांची विशेष मोहिम
ऊसतोड मुकादमांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या घटना उघडकीस येत होत्या. हे लक्षात घेता कोल्हापूर जिल्हा पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी जिल्ह्यातील 31 पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हे दाखल करण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन केले होते. या मोहिमेतून फसवणुकीचे आतापर्यंत इतके गुन्हे उघडकीस आले आहेत. एकूण 34 कोटी 66 लाख 87 हजार 193 रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. यामध्ये चेक न वटलेली दहा प्रकरणे आहेत. या मोहिमेमुळे शेतकऱ्यांनी पुढे येऊन गुन्हे दाखल केले आहेत. यामुळे फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करणे पोलिसांना सोपे होणार आहे.
आंबेगाव-भीमाशंकर कारखान्याच्या गेटवर बसून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन
उसाचा अंतिम हप्ता तीनशे रुपये मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केले. आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर साखर कारखान्या समोर भर उन्हामध्ये कारखान्याच्या गेटवर बसून, शेतकऱ्यांनी खर्डा भाकरी खाऊन हे आंदोलन केले. उसाचा उत्पादन खर्च टनामागे 200 ते 250 रुपये वाढला आहे. असे असताना ऊसाला भीमाशंकर कारखाना आणि विघ्नहर सहकारी साखर कारखाना देत असलेला दर खूपच कमी आहे. यावर्षी अंतिम हप्ता तीनशे रुपये न दिल्यास आंदोलन तीव्र केले जाईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.