फरीदकोट : मेव्हण्याला कंटाळून एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पंजाबमधील फरीदकोट येथे घडली आहे. विनय मनचंदा असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. मृत्यूपूर्वी विनयने सुसाईड नोट लिहिली आहे. यात त्याने आपण बहिणीच्या नवऱ्यामुळे आपले जीवन संपवत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी मयत तरुणाच्या काकाच्या तक्रारीवरुन स्थानिक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनयच्या लहान बहिणीचा अमृतसर येथील ईशान अरोरा याच्याशी दोन वर्षापूर्वी विवाह झाला होता. मात्र लग्नानंतर ईशानने विनयच्या कुटुंबीयांकडे दहा लाखांची मागणी केली. पैसै न दिल्यास बहिणीला परत घरी पाठवण्याची धमकी दिली.
मुलीच्या सुखासाठी विनयच्या घरच्यांनी ईशानला 10 लाख रुपये दिले. मात्र पैसे दिल्यानंतरही ईशानने आपल्या पत्नीला माहेरीच ठेवले. गेल्या दोन वर्षापासून ईशानची पत्नी माहेरीच आहे. ईशान पत्नीला घरीही नेत नव्हता आणि दिलेले पैसेही परत करत नव्हता.
वारंवार पैसे मागूनही ईशान पैसे परत देत नव्हता. पैसैही मिळत नव्हते आणि बहिणीलाही सासरी नेत नव्हता. यामुळे विनय तणावात होता. तणावातून बाहेर यावे यासाठी त्याच्या घरच्यांनी त्याला लुधियानाला त्याच्या काकांकडे पाठवले होते.
काकांच्या घरी आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी विनयने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने सुसाईड नोट लिहिली आहे. यात त्याने म्हटलं आहे की, ‘मी ईशान अरोराला आपल्या आत्महत्येसाठी कारणीभूत आहे. त्याने माझ्या कुटुंबासोबत फसवणूक केली आहे. मी आणखी सहन करु शकत नाही.’
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेत त्याआधारे ईशान अरोरा विरोधात कलम 306 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.