शहडोल : गुरु आणि शिष्यातील नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उजेडात आली आहे. शिक्षकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवले. विद्यार्थिनीची दिशाभूल करून शिक्षकाने तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. शिक्षक आणि विद्यार्थिनीमधील या शारीरिक संबंधाला भलतेच वळण लागले. या संबंधातून पीडित विद्यार्थिनी गर्भवती राहिली. नंतर शिक्षकाने स्वतःचे पाप झाकण्यासाठी पीडित विद्यार्थिनीची हत्या केली.
मध्य प्रदेशच्या शहडोल जिल्ह्यात 14 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली होती. पीडित विद्यार्थिनीचा मृतदेह सापडल्यानंतर हत्येचे धक्कादायक सत्य उजेडात आले आहे.
विद्यार्थिनीच्या हत्येमुळे आपण केलेले गैरकृत्य उजेडात येणार नाही, असा समज आरोपी शिक्षकाने केला होता. मात्र अखेर सत्य उजेडात आले. पीडित विद्यार्थिनीचा मृतदेह आढळल्यानंतर तिच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात आली.
यादरम्यान विद्यार्थिनीला तिच्या शिक्षकानेच जीवे मारल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. याप्रकरणी आरोपी शिक्षकाविरुद्ध बलात्कार तसेच हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी शिक्षकाने अल्पवयीन मुलीच्या भावनांशी खेळ करून तिच्याशी अनैतिक संबंध ठेवले. यातून ती गर्भवती राहिली. गर्भवती राहिल्यानंतर विद्यार्थिनी शिक्षकावर लग्नासाठी दबाव टाकत होता.
यातून तिच्यापासून सुटका मिळवण्यासाठी विद्यार्थिनीला कायमची संपवण्याचा कट रचला. विद्यार्थिनीला औषध आहे सांगत विष प्यायला दिले. त्यात विद्यार्थिनीचा मृत्यू झाला.
हत्येचा गुन्हा लपवण्यासाठी पीडितेचा मृतदेह गावच्या विहिरीत फेकला. या घटनेनंतर आरोपी शिक्षकाने पोलिसांच्या तावडीत सापडू नये म्हणून पोबारा केला होता.
पीडित विद्यार्थिनीच्या हत्येचा एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. तसेच विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांनी कुणावरही संशय व्यक्त केला नव्हता, त्यामुळे पीडितेच्या मृत्यूचे गूढ होते.
विद्यार्थिनीचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर ती गर्भवती होती हे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी हत्येच्या अनुषंगाने पुढील तपास सुरू केला. मात्र घटनेचे ठोस पुरावे नसल्यामुळे मारेकऱ्यापर्यंत पोहोचणे पोलिसांसाठी एक मोठे आव्हान होते.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष तपास पथक नेमले होते. पोलिसांनी पीडितेचे कॉल रेकॉर्ड तपासले असता ती सतत कुणाशी तरी संपर्कात असल्याचे कळले.
यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीचा शोध घेत पोलीस आरोपी शिक्षकापर्यंत पोहचली. पोलिसांनी शिक्षकाला ताब्यात घेत चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केले.