मुंबई : फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगार नवनवे फंडे अंमलात आणत आहेत. ऑनलाईन फसवणुकीनंतर आता अॅपच्या माध्यमातून फसवणूक करण्याचे नवे फंडे गुन्हेगारांनी अवलंबले आहेत. मुंबईतील अंधेरी येथे राहणाऱ्या 65 वर्षीय मानसी मुळे या अशाच अॅपच्या फसवणुकीची बळी ठरल्या आहेत. सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या खात्यातून तब्बल 6,91,859 रुपये चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. मानसी यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध आयपीसी कलम 420 (फसवणूक), माहिती कायदा कलम 66(सी) आणि 66(डी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
महिलेने दिलेल्या माहितीनुसार, 20 मार्च रोजी सकाळी 11:30 च्या सुमारास तिच्या पतीच्या मोबाईलवर एक मेसेज आला. या मॅसेजमध्ये मागील महिन्याचे वीज बिल जमा केले नाही, असे लिहिले होते. जर बिल भरले नाही तर त्याचे वीज कनेक्शन तोडले जाईल. काही अडचण आल्यास संपर्क करण्यासाठी या मेसेजसोबत एक नंबरही देण्यात आला होता.
मेसेज वाचताच तिने त्या नंबरवर कॉल केला. फोनवर समोरच्या व्यक्तीने अदानी इलेक्ट्रिसिटी ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगितले. गेल्या महिन्याचे बिल भरले नसल्याचे त्यांनी सांगितले. यावर मानसी यांनी बिल भरल्याचे सांगितले. यानंतर समोरच्या व्यक्तीने बिल ऑनलाइन दिसत नसल्याचे सांगितले. तसेच “टीम व्ह्यूअर क्विक सपोर्ट” अॅप डाउनलोड करण्यास सांगितले.
मानसी यांनी अॅप डाउनलोड केले. अॅपवर त्यांची जुनी बिले दिसू लागली. त्यानंतर काही वेळाने मानसी यांच्या मोबाईलवर तीन वेगवेगळे मेसेज आले. या मॅसेजमध्ये खात्यातून पैसे काढले गेल्याचे लिहिले होते. त्या खात्यातून तीन वेळा एकूण 6 लाख 91 हजार 859 रुपये डेबिट झाले होते.
पैसे काढल्यानंतर मानसी मुळे यांना एसबीआय फ्रॉड मॅनेजमेंटचा फोन आला. बँकेकडून त्यांना खात्यातून पैशाचा व्यवहार केले का अशी विचारणा त्याला करण्यात आली. त्यांनी नकार दिला. नंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर मानसी यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी एफआयआर दाखल केला.