कर्मचाऱ्याने मालकाची तिजोरी पळवली, सीसीटीव्हीमुळे पोलिसांच्या जाळ्यात अडकले !
स्वतःचे कर्ज फेडण्यासाठी नोकरानेच मालकाच्याच दुकानात चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे.
नागपूर / सुनील ढगे : नोकरानेच आपल्या तीन मित्रांच्या मदतीने मालकाच्या दुकानात चोरी केल्याची घटना नागपुरमध्ये उघडकीस आली आहे. चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला आणि 10 लाख रुपये असलेली तिजोरीच पळवली. ही सर्व घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे सक्करदरा पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून 6 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दुकानाचे शटर तोडून तिजोरी लंपास केली
नागपूरच्या सक्करदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पी आर ट्रेडर्सचे कार्यालय आहे. या कार्यालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यावर कर्ज होतं. हे कर्ज फेडण्यासाठी त्याने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने मालकाच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचा कट रचला. त्यानुसार तो साथीदारांसह दुकाने शटर तोडून आत घुसला. त्यानंतर 10 लाखाची रोकड असलेली तिजोरीच चोरट्यांनी उचलून नेली.
सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांना अटक
चोरीची घटना सकाळी उघडकीस येताच मालकाने सक्करदरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत त्याआधारे आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. पोलिसांनी चारही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. अटक केलेल्या आरोपींपैकी दोघांवर कर्ज असल्याने कर्ज फेडण्यासाठी त्यांनी ही चोरी केल्याचे सांगितले.
चोरट्यांकडून मुद्देमाल हस्तगत
या चोरट्यांकडून 4 लाख 60 हजाराची रोख रक्कम आणि तीन दुचाकी असा एकूण 6 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास गुन्हे शाखेचे युनिट 4 चे पथक करीत आहेत. स्वतःच कर्ज फेडण्यासाठी मालकाच्या तिजोरीवर नजर ठेवून त्यांनी चोरी तर केली. मात्र आता त्यांना जेलची हवा खावी लागणार आहे.