पाणीपुरी खायची ऑफर कुणी नाकारतं का? तिने नकार दिला, तोसुद्धा शेजारणीला, पुढे काय झालं वाचा…
वृद्ध महिला दरवाजात उभी होती. बाहेरुन जात असलेल्या शेजारी महिलेने तिला पाणीपुरीची ऑफर दिली. पण वृद्ध महिलेने यास नकार दिला. यानंतर पुढे भयंकर घटना घडली.
नवी दिल्ली : पाणीपुरी म्हटले की कुणाच्याही तोंडाला पाणी सुटते. पाणीपुरी खाण्याचा मोह अनेकांना आवरता येत नाही. मात्र पाणीपुरी खाण्यास नकार दिल्यामुळे चक्क एका वृद्ध महिलेला प्राणाला मुकावे लागले. दिल्लीतील शहादरा जिल्ह्यात ही सर्वांना चक्रावून टाकणारी आणि अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. वृद्ध महिलेने तिला शेजारच्या महिलेने देऊ केलेली पाणीपुरी खाण्यास नकार दिला. हीच गोष्ट पाणीपुरी देणाऱ्या महिलेला खटकली आणि तिचा पारा चढला. ती महिला, तिची आई आणि दोघी वहिन्या यांनी वृद्ध महिलेला मारहाण सुरू केली.
चौघींनी केलेल्या बेदम मारहाण आणि धक्काबुक्कीमुळे वृद्धेच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ती बेशुद्ध झाली. तिला तिच्या सुनेने रुग्णालयात नेले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने वृद्ध महिलेचा काही वेळातच मृत्यू झाला. या घटनेने जीटीबी इन्क्लेव्ह परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
चौघींविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
शकुंतला देवी असे मारहाणीत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून ती 68 वर्षांची वृद्ध होती. तिच्या मृत्यूनंतर सुनेने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शकुंतला देवीला मारहाण करणाऱ्या चारही महिलांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी चारही महिला पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांची अधिक चौकशी सुरु आहे. शकुंतली देवी यांना मारहाण करणारी शेजारील महिला शीतल ही मुख्य आरोपी असून तिच्यासह इतर तिघींविरोधात सदोष मनुष्यवधाऐवजी हत्येचाच गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शकुंतला देवीच्या कुटुंबीयांनी केली आहे.
काय आहे प्रकरण?
खेडा गाव येथील जीटीबी इन्क्लेव्ह या कॉलनीमध्ये शकुंतला देवी यांचा परिवार राहतो. शकुंतला या आपल्या घराच्या दारावर उभ्या होत्या. त्याचदरम्यान शेजारील शितल ही महिला घराजवळून चालली होती. तिने शकुंतला यांना पाणीपुरी ऑफर केली. मात्र शकुंतला यांनी पाणीपुरी घेण्यास नकार दिला. कुंतला देवी यांनी आपला शब्द नाकारून अपमान केला, असा समज करीत शितलने त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.
दोघींमधील बाचाबाची ऐकून शितलची आई आणि दोन वहिन्या तेथे धावत आल्या. यावेळी त्या सर्व महिलांनी शीतलचीच बाजू घेत शकुंतला देवी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी धक्काबुक्कीदरम्यान शकुंतला खाली कोसळल्या. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. परिणामी रुग्णालयात उपचार नेण्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली.