मंत्रालयाच्या दिशेने अर्धनग्न अवस्थेत नागरिक निघाले; नाशिकच्या नागरिकांनी मुंबईची वाट का धरली ? जाणून घ्या
मोर्चा दरम्यान नाशिक पश्चिम विधानसभेच्या आमदार सीमा हिरे यांच्या मध्यस्थीने काही प्रमुख आंदोलनकर्ते पालकमंत्री दादा भुसे यांना भेटण्यासाठी गेले आहेत.
चैतन्य गायकवाड, नाशिक : नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीत स्वतंत्र पोलीस ठाण्याच्या मागणीसाठी दत्तनगर, चुंचाळे शिवार या परिसरातील नागरिकांनी आज नाशिक ते मुंबई असा अर्थनग्न पायी मोर्चा काढला आहे. मंगळवारी सकाळी अंबडच्या एक्सलो पॉईंट येथून नागरिकांचा हा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून अंबड परिसरात गुन्हेगारीने डोकं वर काढलं आहे. खून, दरोडे, धारदार शस्त्राने हल्ले, चेन स्नॅचिंग अशा विविध गुन्हेगारीच्या घटना या परिसरात सर्रासपणे घडत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. अंबड पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्र मोठं असल्याने, या भागात स्वतंत्र पोलीस ठाणे व्हावे यासाठी नागरिकांनी या अगोदर आमदार, पोलीस आयुक्त तसेच पालकमंत्री दादा भुसे यांना देखील निवेदन दिले आणि वेळोवेळी आंदोलन देखील केले. मात्र या मागणीवर कोणतीही कार्यवाही न झाल्याने अंबड परीसरातील नागरिक आक्रमक झाले आहे.
अतिरिक्त पोलीस स्टेशनचा प्रश्न मंत्रालय दरबारी नेण्यासाठी आपण अर्धनग्न होऊन नाशिक ते मुंबई मोर्चा काढल्याचे आंदोलकांनी सांगितले.
मोर्चा दरम्यान नाशिक पश्चिम विधानसभेच्या आमदार सीमा हिरे यांच्या मध्यस्थीने काही प्रमुख आंदोलनकर्ते पालकमंत्री दादा भुसे यांना भेटण्यासाठी गेले आहेत.
मात्र जोपर्यंत लेखी स्वरुपात ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत हा मोर्चा थांबणार नाही असा इशारा देखील आंदोलकांनी दिला आहे.
काही आंदोलनकर्ते पालकमंत्री दादा भुसे यांच्यासोबत बैठकीसाठी गेले असले तरी काही आंदोलन मात्र मुंबईच्या दिशेने जात आहे.
चुंचाळे आणि एमआयडीसी क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सतात्याने गुन्हेगारीच्या घटना घडत आहे. त्यात अंबड पोलीस ठाण्याच्या हद्द मोठी आहे.
एकूणच पोलीस स्टेशनच्या मागणीसाठी निवेदन देणे, आंदोलन करणे, लोकप्रतिनिधींना साकडे घालणे अशा विविध मार्गाने मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याने नागरिक आक्रमक झाले आहे.
पालकमंत्री दादा भुसे यांच्या मध्यस्थीला यश येते का ? आंदोलक नागरिक काय भूमिका घेतात ? याकडे अंबडच्या पंचक्रोशीतील नागरिकांचे लक्ष लागून आहे.