फेसबुकवर रेल्वेत भरतीचे आमिष दाखवत लाखों रुपयांना गंडा, तिघांच्या मुसक्या आवळल्या !
नोकरीचे आमिष दाखवत बेरोजगार तरुण-तरुणींची फसवणूक करण्याच्या घटना वाढत आहेत. फसवणूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर केला जात आहे.
जितेंद्र पाटील, टीव्ही 9 मराठी, पालघर / 19 ऑगस्ट 2023 : हल्ली फसवणुकीसाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. विविध माध्यमातून सोशल मीडियावर लोकांना टार्गेट केले जाते आणि लुटले जाते. अशीच एक घटना पालघरमध्ये उघडकीस आली आहे. फेसबुकवरुन मैत्री करत तरुण-तरुणींना रेल्वेत नोकर भरतीचे आमिष दाखवत फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. एका आरोपीला नाशिकमधून तर दोघांना उत्तर प्रदेशातून अटक करण्यात कासा पोलिसांना यश आलं आहे. डहाणूतील एका तरुणीच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दीपक किशोर दर्शन, विवेक कुमार कैलास चंद्र आणि राहुल प्यारेलाल पाल अशी अटक आरोपींची नावे आहेत.
काय आहे मोडस ऑपरेंडी?
मुख्य आरोपी दीपक किशोर दर्शन हा बोईसर येथील रहिवासी आहे. तो फेसबुकवरुन तरुण-तरुणींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायचा. रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर काही दिवसांनी आरोपी त्यांना रेल्वे विभागात नोकरी लावून देतो असे सांगायचे. नोकरीसाठी लाखों रुपये त्यांच्याकडून उकळायचा. डहाणूतील तरुणीचीही अशाच प्रकारे फसवणूक करण्यात आली होती. नोकरी लावण्यासाठी योगिता चौधरी या तरुणीकडून चार लाख रुपये उकळले होते. योगितासह अन्य तिघांकडूनही अशाच प्रकारे चार-चार लाख रुपये उकळले होते.
पैसे घेतल्यानंतर आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरवात केली. त्यानंतर आरोपीचा फोन बंद झाला. आपली फसवूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने कासा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. यानंतर कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संदीप नागरे यांनी प्रकरणाचा तपास केला. गुप्त माहितीच्या आधारे मुख्य आरोपी दीपकला नाशिकमधून सापळा रचून अटक केली. तर विवेक कुमार कैलास चंद्र आणि राहुल प्यारेलाल पाल या दोघांना उत्तर प्रदेशातून सापळा रचत अटक केली आहे.
कासा पोलीस ठाण्यात कलम 420, 406, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आलं. या आरोपींनी आणखी किती जणांची अशा प्रकार नोकरीचं आमिष देऊन फसवणूक केली आहे याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.