पाटणा : पैशासाठी जावयानेच मेव्हण्याच्या मदतीने सासूचा काटा काढल्याची धक्कादायक घटना बिहारमधील पाटणा शहरात घडली आहे. शहरातील एका नाल्यात सापडलेल्या महिलेच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. पैशांच्या हव्यासापोटी बबिता देवी नावाच्या महिलेची हत्या करण्यात आली. या हत्येच्या कटात बबिता देवीच्या बहिणीच्या जावयाचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. बबिता देवीच्या बहिणीचा जावई गुड्डू कुमार आणि त्याचा मेव्हणा सूरज कुमार उर्फ फंटुश या दोघांनी पैशासाठी हत्या केली. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, हत्येसाठी वापरलेली रिक्षा आणि महिलेचे 2 लाख 63 हजार रुपये हस्तगत केले आहेत.
बायपास पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धवलपुरा भागातील नाल्यात 15 मे रोजी बबिता देवी हिचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी अज्ञात महिलेचा मृतदेह सापडल्याचा गुन्हा पाटणा पोलिसांनी दाखल केला होता. त्यानंतर तपासचक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी अवघ्या पाच दिवसांत गुन्ह्याची उकल करण्यात यश मिळवले. हत्या झालेली बबिता देवी ही गया जिल्ह्यातील सिकारिया बेलदार बिघा येथील रहिवासी असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली. अधिक तपासात तिच्या हत्येमागील धक्कादायक कारणाचा उलगडा झाला आहे.
आरोपींना अटक केल्यानंतर पोलीस चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. महिलेच्या मृत्यूमागील नेमक्या कारणाचा उलगडा करण्याचे आव्हान होते. बबिता देवी हिने नुकतीच संपतचक येथील आपली जमीन विकली होती. त्यातून आलेल्या पैशांतून तिने दुसऱ्या ठिकाणी जमीन खरेदी केली होती. जमीन खरेदी करूनही तिच्याकडे आणखी पैसे उरले होते. त्या पैशांवर गुड्डू कुमारचा डोळा होता. तेच पैसे लाटण्यासाठी त्याने बबिता देवीची हत्या केली.
आरोपी गुड्डू कुमार आणि सूरज कुमार उर्फ फुंटुश या दोघांनी 14 मे रोजी बबिता देवीला बहाणा करून आपल्या घरी बोलावले. नंतर तिची हत्या करण्यात आली. घटनेच्या रात्री उशिरा दोघांनी बबिता देवीचा मृतदेह रिक्षातून ढवळपुरा बाहेरील नाल्यात फेकून दिला. नंतर बबिता देवीच्या भाड्याच्या घरात जाऊन तिने विकलेल्या जमिनीची रक्कम चोरून नेली.