पिंपरी चिंचवड / रणजित जाधव : झोपेतून उठवल्यामुळे संतापलेल्या मुलाने जन्मदात्या आईला संपवल्याची खळबळजनक घटना पिंपरी- चिंचवड शहरात उघडकीस आली आहे. परेगाबाई अशोक शिंदे असे 58 वर्षीय हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर विश्वास अशोक शिंदे अस 30 वर्षीय आरोपी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट 2 ने आरोपी मुलाला बेड्या ठोकल्या आहेत. विश्वास हा सराईत गुन्हेगार असून, एका हत्येप्रकरणी याआधी तो 4 वर्षे तुरुंगात होता.
परेगाबाई यांना तीन मुली आणि एक मुलगा अशी चार अपत्ये आहेत. तिन्ही मुलींची लग्न झाली आहेत. विश्वास हा कचऱ्याच्या घंटागाडीवर लेबर म्हणून कामाला जात होता. तर परेगाबाई या ही कचरा गोळा करण्याचे काम करत होत्या. 2015 मध्ये एका हत्या प्रकरणात विश्वासला 4 वर्षे तुरुंगवास झाला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याला दारुचे व्यसन जडले. यामुळे नेहमी मायलेकांमध्ये वाद होत होते.
दारुच्या नशेत झोपलेल्या मुलाला परेगाबाई कामावर जाण्यासाठी सकाळी उठवत होत्या. झोपेतून उठवल्यामुळे मुलगा संतापला आणि आईवर जीवघेणा हल्ला केला. यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत परेगाबाई जीव वाचवण्यासाठी बाहेर पळाल्या. मात्र पळता पळता त्या पाय अडकून पडल्या. विश्वासही त्यांच्या मागे पुन्हा हल्ला करण्यासाठी पळत होता. मात्र यावेळी शेजारी धावत बाहेर आल्याने तो तेथून पळाला.
शेजाऱ्यांनी परेगाबाईच्या मुलीला घटनेची माहिती दिली. मुलीने तात्काळ येत आईला तळेगाव येथील रुग्णालयात नेले. मात्र मारहाणीत परेगाबाई यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला परेगाबाई या पाय घसरुन पडल्यामुळे त्यांना गंभीर जखम होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे सर्वांना वाटत होते. मात्र खबऱ्याने पोलिसांना घटनेची माहिती देत मुलाच्या मारहाणीत आईचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
पोलिसांनी सदर प्रकरणाचा गोपनीय तपास करुन सर्व सत्यता पडताळली. अत्यंत कौशल्याने तपास करत पोलिसांनी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या मुलाला सापळा रचून अटक केली. यानंतर मुलाची कसून चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनायक कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उपायुक्त गुन्हे स्वप्न गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, उपनिरीक्षक गणेश माने तसेच पोलीस अंमलदार शिवानंद स्वामी, दिलीप चौधरी, आतिश कुडके, अजित सानप, शिवाजी मुंडे, उद्धव खेडकर यांनी केली.