आकर्षक परताव्याचे आमिष दाखवत दाम्पत्याचा गंडा, गुंतवणुकदारांचे तब्बल ‘इतके’ लाख लुटले !
आपल्या कंपनीच्या मार्फत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा मिळेल, असे आमिष दाखवत दाम्पत्याने लोकांना पैसे गुंतवण्यास सांगितले.
अभिजीत पोते, पुणे : आकर्षक परताव्याचे आमिष दाखवत गुंतवणुकीच्या नावाखाली लोकांची फसवणूक केल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. एकूण 32 जणांची सुमारे 86 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश जोशी आणि अश्विनी जोशी अशी फसवणूक करणाऱ्या दाम्पत्याची नावे आहेत. वारजे पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या दाम्पत्याने सामान्य नागरिकांसह मित्र आणि नातेवाईकांनाही गंडा घातला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यत आली नाही.
अल्पावधीत आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवले
पुण्यातील वारजे पोलीस ठाण्याच्या हद्दीत जोशी दाम्पत्याने रियल व्हॅल्यू एंटरप्राईजेस या नावाने कंपनी सुरु केली होती. या कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूक करा आणि अल्पावधीत आकर्षक परतावा मिळवा, असे आमिष या दाम्पत्याने गुंतवणूकदारांना दाखवले. जोशी दाम्पत्याच्या भूलथापांना भुलून जोशी यांनी तक्रारदार तसेच त्यांचे इतर मित्र आणि नातेवाईक अशा एकूण 32 जणांचा आधी विश्वास संपादन केला. रियल व्हॉल्यू इंटरप्राईजेस या नावाने कंपनी असून, सदरची संस्था शेयर मार्केट मध्ये मध्ये उलाढाल करते असे सांगितले.
पैसे परत न मिळाल्याने गुंतवणूदारांनी पोलीस ठाणे गाठले
वार्षिक गुंतवणुकीवर चांगला आकर्षक परतावा मिळवून देण्याच्या योजना सांगितल्या. यानंतर आरोपींनी सर्वांचे मिळून एकत्रित 86 लाख 75 हजार रुपयांच्या ठेवी स्वीकारल्या. त्यानंतर कोणत्याही गुंतवणूकदारांना परतावा आणि गुंतवणूक केलेली रक्कम परत केले नाही. यामुळे आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर गुंतवणूकदारांनी पोलीस ठाणे गाठत जोशी दाम्पत्याविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली.