पुणे : पुण्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका विवाहितेला पिस्तुलचा धाक दाखवून हॉटेलची पॉवर ऑफ अॅटर्नी नावावर करुन घेतल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विवाहितेच्या तक्रारीवरुन कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वजीत विनायकराव जाधव, अभिजित विनायकराव जाधव, विनायकराव जाधव आणि वैशाली विनायकराव जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक विक्रम गौड अधिक तपास करीत आहेत.
मुख्य आरोपी विश्वजीत आणि पीडितेचा चार-पाच वर्षापूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर विवाहितेचा सासरी शारीरिक आणि मानसिक छळ सुरु होता. तसेच पतीने तिला ड्रग्ज आणि दारु पाजून तिच्यावर बळजबरीने शरीरसंबंधही केले होते. यानंतर सर्व छळाला कंटाळून विवाहिता सासरचे घर सोडून माहेरी गेली. विवाहितेच्या वडिलांचे पुण्यात प्रसिद्ध हॉटेल आहे. या हॉटेलची पॉवर अॅटर्नी विवाहितेच्या नावावर आहे.
गेल्या आठवड्यात आरोपी आणि पीडितेची भेट झाली. यावेळी आरोपीने पिस्तुलचा धाक दाखवून महिलेकडून जबरदस्तीने पॉवर ऑफ अॅटर्नी आपल्या नावावर करुन महिलेच्या वडिलांचे हॉटेल नावावर करुन घेतले. तसेच आरोपीने कंपनीच्या नावावर खरेदी केलेल्या कोट्यावधींच्या 4 कारची परस्पर विक्री करुन विवाहितेची फसवणूक केली. विवाहितेचे 1 कोटी 70 लाख रुपयांचे लग्नातील दागिने आणि वस्तू तसेच दोन कार आरोपी आणि त्याचा भाऊ वापरत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शिवाजीनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.