चित्तोडगढ : प्रेमसंबंधाला विरोध करणाऱ्या मुलीने प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या बापाचाच काटा काढल्याची घटना राजस्थानमध्ये घडली आहे. चित्तोडगढ पोलिसांनी 15 दिवसांपूर्वी घडलेल्या हत्याकांडाचा उलगडा करण्यास यश आले आहे. पोलिसांनी आरोपी मुलगी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. आरोपींची चौकशी सुरु आहे. सुशीला उर्फ सुष्या गाडरी आणि बाबूलाल तेली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गमेर गाडरीने 3 मे रोजी आपल्या मुलीचे लग्न ठरवले होते. मात्र लग्नाच्या दोन दिवस आधीच मुलीने बापाचा काटा काढला.
कोलपुरा येथील गमेर गडरी यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार 1 मे रोजी कापसन पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. पोलिसांनी बेपत्ता गडरी यांचा शोध सुरु केला. यादरम्यान रोलिया गावातील सहार्ड येथील विहिरीत एका व्यक्तीचा मृतदेह पडलेला आढळून आला. तपासात बेपत्ता गमेर गडरी याचाच हा मृतदेह असल्याची खात्री पटली. त्यानंतर मृताचा पुतण्या उदयालाल गडरी याने गमेर गडरी यांच्या हत्येची भीती व्यक्त केली होती. यावरून या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्यात आली.
प्रकरणाचा कसून तपास करत अखेर पोलीस आरोपींपर्यंत पोहचले. सत्य उघड होताच पोलीसही हैराण झाले. गडरी याच्या मुलीच्या सांगण्यावरुन तिच्या प्रियकराने पित्याची हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. गडरी याची मुलगी सुशीला उर्फ सुश्या गडरी हिचे शेजारील गावातील बाबूलाल तेली याच्याशी सात ते आठ वर्षांपासून अनैतिक संबंध होते. सुशीला 27 वर्षाची आहे, तर बाबुलाल हा 49 वर्षाचा आहे. गमेर गडरी याला हे संबंध मंजूर नव्हते. त्याने आपल्या मुलीचा तिच्या वयाच्या तरुणाशी विवाह ठरवला होता. 3 मे रोजी हा विवाह होणार होता. तत्पपूर्वीच मुलीने पित्याचा काटा काढला. मग मृतदेह विहिरीत टाकला.
लग्नाची तारीख जवळ येत होती तसे आरोपींनी गमेर गडरीचा काटा काढण्याचा कट रचला. प्लाननुसार, मुलीने 29 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास वडिलांना काही कामासाठी विहिरीकडे पाठवले. तेथे आरोपी बाबूलाल तेली याने जैतपुराकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर गमेर गडरी याला मोटारसायकलवरून नेले. मग विहिरीजवळ नेत त्याला दुचाकीवरून खाली पाडले. नंतर त्याची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकून दिला.