चोरट्यांचा हैदोस सीसीटीव्हीत कैद, घर आणि दुकान फोडण्यात यशस्वी, एटीएम फोडण्याचा प्रयत्न मात्र फसला, नाशिकमध्ये काय चाललंय?
पळसे गावात मध्यरात्रीच्या वेळी चोरट्यांनी हैदोस घालत केलेली चोरी ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे, त्याच्याकडे त्यावेळी धारधार हत्यारे असल्याचे देखील स्पष्ट दिसून येत आहे.
नाशिक : नाशिक शहरासह ग्रामीण भागात चोरट्यांचा हैदोस काही केल्या कमी व्हायला तयार नाहीये. नाशिकरोड पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असलेलेल्या पळसे गावात चोरट्यांनी रात्री घरफोडी, दुकान फोडून लाखोंचा मुद्देमाल चोरी केला असून विशेष म्हणजे यावेळी चोरट्यांनी एटीएम फोडण्याचाही प्रयत्न केला आहे. त्यामुळे या चोरीची अधिकच चर्चा होत असून चोरट्यांचा हैदोस सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यामध्ये चोरट्यांनी चार तोळे सोने आणि किराणा मालासह रोख रक्कम घेऊन पसार झाले आहे. गावातच असलेल्या खाजगी बँकेचे एटीएमही फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला मात्र एटीएम फोडीचा प्रयत्न फसल्याने चोरट्यांनी सिन्नर शहराकडे पळ काढला होता. तिथेही एका किराणा दुकानात चोरी करून दहा हजार रुपयांची रक्कम लंपास केली आहे. एकाच रात्रीत चोरट्यांनी घातलेला हा हैदोस वेगवेगळ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून ग्रामीण पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहे. खरंतर गेल्या काही महिन्यांपूर्वी नाशिकच्या सिन्नर भागात रात्रीच्या वेळी टाकेलेल्या दरोडयानी संपूर्ण नाशिक जिल्हा हादरून गेला होता.
पळसे गावात मध्यरात्रीच्या वेळी चोरट्यांनी हैदोस घालत केलेली चोरी ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे, त्याच्याकडे त्यावेळी धारधार हत्यारे असल्याचे देखील स्पष्ट दिसून येत आहे.
सीसीटीव्ही चित्रित झाल्याप्रमाणे चोरट्यांनी घरं, किराणा दुकान फोडून लाखोंचा मुद्देमाल लंपास केला आहे. याशिवाय त्यांनी जवळच असलेले खाजगी बँकेचे एटीएमही फोडण्याचा प्रयत्न केला होता.
चोरट्यांनी घातलेला धुमाकूळ सिन्नरम नाशिकरोडसह जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला असून पोलीसांनी याबाबत कठोर पाऊले उचलून ही गुन्हेगारी रोखावी अशी मगणी केली जात आहे.
चोरट्यांनी वेगवेगळ्या चोरीत दहा लाखांहून अधिक रकमेचे दागिने चोरून नेले असून किराणामालासह रोख रक्कम देखील लंपास केली आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पळसे परिसरातील हा चोरट्यांचा हैदोस पोलीस कसा उघडकीस आणणार? चोरट्यांचा मुसक्या आवळण्यासाठी पोलीस काय कारवाई करणार याकडे पळसे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.