प्रसादाचा बहाणा, मात्र डोक्यात आधीच शिजलं होतं, ‘ती’ येताच नराधमासारखा तुटून पडला, पण…
ती मनोभावे गुरुद्वारात पूजा करण्यासाठी येत होती. आरोपी पुजारी तिला रोज पहायचा. तिला बघून आरोपीची नियत फिरली आणि तो संधीच्या शोधात होता.
निनाद करमरकर, उल्हासनगर : प्रसाद आणून देण्यास सांगत पुजाऱ्याने अल्पवयीन मुलीला इमारतीजवळ बोलावले. मग प्रसाद घेऊन घरी येण्यास सांगत इमारतीच्या जिन्यातच तिच्याशी अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. यानंतर पीडित तरुणीने कशीबशी सुटका करत घर गाठले आणि कुटुंबीयांना सर्व हकीकत सांगितली. यानंतर मुलीच्या घरच्यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अवतार अंकल असे फरार आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला, तरी या पुजऱ्याला अटक करण्याची मागणी पीडितेच्या बहिणीने केली आहे.
आरोपी गुरुद्वारातील पुजारी
उल्हासनगरच्या सेक्शन 17 मध्ये थायरासिंग दरबार नावाचा गुरुद्वारा आहे. या गुरुद्वारात अवतार सिंग हा पाठी म्हणजेच पुजारी म्हणून काम करतो. 19 एप्रिल रोजी पीडित मुलगी ही सकाळी 8.30 च्या सुमारास गुरुद्वारात गेली असता अवतार सिंग याने तिला आपल्यासाठी गुरुद्वाराचा प्रसाद घेऊन येण्यास सांगितलं. हा प्रसाद घेऊन ही तरुणी अवतार सिंग राहत असलेल्या गुरुद्वाराच्या मागच्या इमारतीत जात असताना जिन्यातच अवतार सिंग याने तिचा विनयभंग केला. त्यावर पीडित मुलीने प्रतिकार केला असता माझ्याशी प्रेमसंबंध न ठेवल्यास बघून घेईन अशी धमकी अवतार सिंग याने दिली.
आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
या प्रकारानंतर पीडित मुलीने मध्यवर्ती पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देताच पोलिसांनी अवतार सिंग याच्याविरोधात विनयभंग आणि पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. मात्र या गुन्ह्यात 7 वर्षांपर्यंतचीच शिक्षा असल्यानं आरोपीला अटक करण्याची तजवीज नाही. त्यामुळे पोलिसांनी अवतार सिंगला अटक केलेली नाही. त्यामुळे आज पीडित मुलीच्या बहिणीने पत्रकार परिषद घेत नाराजी व्यक्त केली. तर पोलिसांचा तपास सुरू असल्याची माहिती उल्हासनगरचे सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड यांनी दिली.
थायरासिंग दरबार हा उल्हासनगरमधील नामांकित गुरुद्वारा म्हणून ओळखला जातो. वर्षभर चालणारा मोफत लंगर, मोफत दवाखाने, चांगल्या कामांमुळे या गुरुद्वाराबद्दल उल्हासनगरवासीयांची वेगळी आस्था आहे. त्यामुळेच या विनयभंग प्रकरणात थायरासिंग दरबाराचा संबंध नसला, तरी पुजारी हा या गुरुद्वारात काम करत असल्यानं त्याच्यावर कारवाईची मागणी दरबारने सुद्धा करावी, अशी अपेक्षा व्यक्त होतेय.