Thane Crime : पोलिसांना खबरी देतो म्हणून एकाला जबर मारहाण, मारहाणीत जखमी इसमाचा मृत्यू
मध्यरात्री घरी जात असताना एका व्यक्तीला तिघा इसमांनी बेदम मारहाण केली होती. यावेळी पोलिसात तक्रार नोंद करण्यात आली होती. मात्र आरोपींना अटक केल्यानंतर धक्कादायक प्रकरण समोर आलं.
उल्हासनगर / 24 ऑगस्ट 2023 : पोलिसांना खबरी देत असल्याच्या रागातून एकाची मारहाण करत हत्या केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. राजेश कुकरेजा असे हत्या झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. मनिष डिसुजा, गौरव गोदिया आणि बाळा उर्फ समीर गायकवाड अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत. सुरवातीला क्षुल्लक कारणातून मारहाण झाल्याचे पोलिसांना वाटत होते. मात्र आरोपींना अटक केल्यानंतर धक्कादायक कारण समोर आलं.
काय आहे प्रकरण?
राजेश कुकरेजा हे उल्हासनगर कँप 4 परिसरात राहतात. कुकरेजा 16 जुलै रोजी मध्यरात्री घरी परतत असताना तिघा आरोपींना त्यांना वाटेत अडवले. तिघांनी त्यांना बेदम मारहाण केली. मारहाणीची घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. या मारहाणीत कुकरेजा हा गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी उल्हासनगरमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान त्याचा अखेर मृत्यू झाला आहे.
छापेमारी करत तिघांना अटक
याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धक्का लागल्याने राजेश कुकरेजा याला मारहाण झाल्याचा गुन्हा विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दाखल होता. यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला. तपासासाठी पोलीस उपायुक्त डॉ.सुधाकर पठारे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने एक पथक तयार केलं. या पथकाने विविध परिसरात छापेमारी करत तीन आरोपींना अटक केली.
आरोपींची चौकशी केली असता आरोपींनी हत्येची कबुली देत हत्येचे कारण स्पष्ट केले. पोलिसांना खबरी देत असल्याच्या रागातून कुकरेजा याची हत्या केल्याचे आरोपींनी पोलीस चौकशीत सांगितले. पोलीस पुढील तपास करत आहेत.