जुन्या वादातून शिवसेना विभाग प्रमुखाला मारण्याची सुपारी, उल्हासनगरात चाललंय काय?
शिवसेना विभागप्रमुख आणि आरटीआय कार्यकर्त्यामध्ये काही कारणातून काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेला. मग आरटीआय कार्यकर्त्याने जे केले ते भयानक.
उल्हासनगर / निनाद करमरकर : जु्न्या वादातून शिवसेना विभाग प्रमुखाला जीवे मारण्यासाठी 10 लाखाची सुपारी दिल्याची खळबळजनक घटना उल्हासनगरमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणात सुपारी घेणाऱ्या गुंडालाच पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, सुपारी देणारा आरोपी अजूनही फरार आहे. सुनील शर्मा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर कारी माखिजा असे सुपारी देणाऱ्या आरोपीचे नाव असून, तो आरटीआय कार्यकर्ता आहे. पोलीस फरार माखिजा याचा कसून शोध घेत आहेत. या घटनेमुळे उल्हासनगरच्या राजकीय वर्तुळात मात्र खळबळ उडाली आहे.
शिवसेना विभागप्रमुख आणि आरटीआय कार्यकर्त्याचा वाद होता
उल्हासनगरमधील शिवसेना विभाग प्रमुख सुनील सिंग उर्फ कलवा आणि आरटीआय कार्यकर्ता कारी माखिजा यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. याच वादातून कारी माखिजा याने सुनील सिंग उर्फ कलवा यांना जीवे मारण्यासाठी सुनील शर्मा या गुंडाला 10 लाख रुपयांची सुपारी दिली होती. मात्र याची कुणकुण लागताच सुनील सिंग यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबत तक्रार दिली.
पोलिसांनी सुपारी किलरला केली अटक
सुनील सिंग यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करत घटनेचा तपास केला. तपासादरम्यान पोलिसांनी गुंड सुनील शर्मा याला बेड्या ठोकल्या. आरोपीला अटक करत त्याची चौकशी केली असता, चौकशीत कारी माखिजा याने आपल्याला सुनील सिंग यांना मारण्यासाठी 10 लाख रुपयांची सुपारी दिल्याचं त्याने कबूल केलं. कारी माखिजा हा फरार झाला आहे. पोलीस माखिजा याचा सर्वत्र कसून शोध घेत आहेत.