रायबरेली : व्हरांड्यात वर्ग घेण्यावरुन प्राथमिक शाळेतील दोन शिक्षिका एकमेकींना भिडल्याची लज्जास्पद घटना उत्तर प्रदेशातील रायबरेलीत उघडकीस आली आहे. या शिक्षिकांनी विद्यार्थ्यांसमोर एकीने दुसरीला मारहाण करण्यास सुरुवात केली. शाळेतील हे दृश्य पाहून विद्यार्थी घाबरले. घटनास्थळी उपस्थित एका व्यक्तीने ही घटना मोबाईलमध्ये कैद केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
डलमऊ तहसीलमधील खलीलपूर प्राथमिक शाळेत ही घटना घडली आहे. शाळेच्या व्हरांड्यात वर्ग लावण्यावरुन दोघींमध्ये वाद सुरु झाला. पहिली म्हणत होती वऱ्हांड्यात वर्ग होणार नाही. दुसरी म्हणाली मी बघते मला कोण अडवतं ते.
यानंतर दोघींमधील वाद वाढत गेला. यातून वऱ्हांड्यात वर्ग घेऊ इच्छिणाऱ्या शिक्षिकेने दुसरीच्या जवळ जात तिच्या दोन-तीन थोबाडात लगावल्या आणि अंगठा कापला.
अनिता आणि पूजा अशी या शिक्षिकांची नावे आहेत. अनिताने पूजाच्या कानाखाली लगावली. दोघींचा गोंधळ ऐकून मुख्याध्यापक तेथे आले आणि त्यांनी दोघींना समजावून शांत केले. मात्र शिक्षिकांचे हे कृत्य अत्यंत लाजिरवाणे आहे.
ही बाब निदर्शनास आली आहे. एक टीम तयार करून, नियमानुसार संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे. दोषींवरही कारवाई केली जाईल. याशिवाय शिक्षकांनी ज्या प्रकारे मुलांसमोर हे कृत्य केले आहे ते कोणत्याही प्रकारे समर्थनीय ठरू शकत नाही, असे बीएसए शिवेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.