उत्तर प्रदेशात दिल्ली अपघाताची पुनरावृ्त्ती, सायकलला धडक देत मुलीला 200 मीटर फरफटत नेले
नेहमीप्रमाणे 1 जानेवारी रोजी दुपारी पीडित मुलगी सायकलवरुन कॉम्प्युटर क्लासला चालली होती. यादरम्यान बाजापूर गावाजवळ मागून येणाऱ्या एका कारने मुलीच्या सायकलला धडक दिली.
कौशांबी : दिल्ली कंझावाला अपघाताचे प्रकरण ताजे असतानाच आता उत्तर प्रदेशात दिल्लीची पुनरावृत्ती झाल्याचे उघडकीस आले आहे. उत्तर प्रदेशातील कौशांबीमध्ये एका मुलीला कारने धडक देत 200 मीटर फरफटत नेल्याची घटना घडली आहे. या अपघातात मुलगी गंभीर जखमी असून, तिचा एक हात आणि एक पाय तुटला आहे. स्थानिकांनी तात्काळ मुलीला रुग्णालयात दाखल केले. मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पीडितेच्या तक्रारीवरून मंझनपूर पोलिसांनी आरोपी कारचालकाविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
सायकलवरुन कॉम्प्युटर क्लासला चालली होती मुलगी
देवखरपूर गावात राहणारी कौशल्या देवी मंझरपूरमधील एका खाजगी कॉम्प्युटर क्लासमध्ये शिकत होती. नेहमीप्रमाणे 1 जानेवारी रोजी दुपारी पीडित मुलगी सायकलवरुन कॉम्प्युटर क्लासला चालली होती. यादरम्यान बाजापूर गावाजवळ मागून येणाऱ्या एका कारने मुलीच्या सायकलला धडक दिली.
कारच्या धडकेत मुलगी खाली पडली आणि 200 मीटर फरफटत गेली
या धडकेत मुलगी सायकलवरुन खाली पडली. यावेळी कारचालकाने कार थांबवण्याऐवजी मुलीच्या अंगावरुन कार नेत पळण्याचा प्रयत्न केला. यावेळी कारमध्ये अडकून मुलगी 200 मीटरपर्यंत फरफटत गेली.
अनियंत्रित कार खड्ड्यात पडली
यादरम्यान कार अनियंत्रित झाली आणि रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पडली. यानंतर दारुच्या नशेत धुंद असलेला कारचालक गाडी तिथेच टाकून फरार झाला. तेथे उपस्थित स्थानिक नागरिकांनी मुलीची सुटका करत तिला रुग्णालयात नेले.
अपघातात मुलीला गंभीर दुखापत
या घटनेत मुलीचा एक हात आणि एक पाय तुटला आहे, तसेच मुलीचा चेहरा, छाती, पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी मंझरपूर पोलिसात आरोपी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणचा सखोल तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत कारचालकही जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राम नरेश असे आरोपी कार चालकाचे नाव आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त कार जप्त केली आहे.