जालौन : उत्तर प्रदेशातील जालौनमधील इंदिरानगरमधील मंजू हत्याकांडाचा उलगडा करण्यास अखेर पोलिसांना यश आले आहे. प्रेमप्रकरणातून पती संतोषनेच मंजूची हत्या केली होती. तब्बल 17 वर्षांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेनंतर आरोपी संतोष संशयास्पद परिस्थितीत बेपत्ता झाला आणि काही दिवसांनी प्रेयसीसोबत लग्न करून तो कानपूर ग्रामीण भागात राहू लागला.तर गेल्या 17 वर्षांपासून न्यायासाठी पोलीस ठाण्याच्या चकरा मारणाऱ्या मंजूच्या नातेवाईकांनी गेल्या आठवड्यात जालौन एसपींची भेट घेतली. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी आता संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला आहे.
जनसुनावणीत मंजूची आई आली होती. तक्रार पाहून सीओवर जबाबदारी दिली आणि आधी मंजूच्या पतीला उचलण्यास सांगितले, अशी माहिती जालौनचे एसपी डॉ. इराज राजा यांनी दिली. दुसरीकडे, पोलिसांनी पतीला कानपूरहून ताब्यात घेत चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. संतोषचं दुसऱ्या मुलीवर प्रेम होतं. यामुळे आपल्या आवडत्या मुलीशी लग्न करण्यासाठी आरोपीने काकाच्या मदतीने पत्नीचा काटा काढल्याचं सांगितलं.
यानंतर पोलिसांनी आरोपीच्या काकालाही अटक केली आहे. 2006 मध्ये जालौनच्या ओराई कोतवाली गावात विवाहितेची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी तिचा मृतदेह जवळच्या जंगलातून ताब्यात घेतला होता. महिलेच्या भावाने आपल्या मेहुण्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली होती. हुंड्यासाठी बहिणीची हत्या केल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी वेळीच त्याच्यावर गुन्हा दाखल केला, मात्र पुढे कारवाई झाली नाही.
महिलेचे कुटुंबीय गेली 17 वर्षे पोलिसांकडे विनवणी करत होते, मात्र त्यांनी ऐकले नाही, असा आरोप आहे. मात्र आता हे प्रकरण एसपींकडे गेल्यानंतर नव्याने प्रकरणाची चौकशी करण्यात आली, त्यानंतर संपूर्ण प्रकरण उघड झाले आहे.