लखनऊ : पूर्वी प्रेम आंधळे असल्याचे म्हटले जायचे. कारण त्यावेळी सर्वच प्रेमयुगुले एकमेकांवर जीवापाड प्रेम करायची. हल्ली मात्र प्रेमाला अधिक प्रमाणात रक्तरंजित स्वरूप लाभत चालले आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये प्रेमवीराने लग्नाच्या दिवशीच प्रेयसीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. लग्नाच्या बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज झालेल्या प्रेयसी तरुणीला तिच्या प्रियकराने ब्युटी पार्लरला जाण्याचा बहाणा करून बोलावून घेतले. मग तिला घेऊन पिकनिक स्पॉटला गेला आणि तिथे तिचा दुपट्ट्याने गळा आवळला. प्रियकर वराच्या कृत्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रेयसीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह जंगलात फेकून दिला. पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे. कुकरैल येथील जंगलातून तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.
जुने महानगर घोसियाना येथे राहणारे फुगा विक्रेता संजय कुमार कश्यप यांची 22 वर्षीय मुलगी कोमलचा विवाह 4 मे रोजी रायबरेली येथील राहुलसोबत होणार होता. राहुल आणि कोमल या दोघांचा प्रेमविवाह होणार होता. प्रेमविवाहाला कोमलच्या कुटुंबीयांनीही सहमती दिली होती. कोमलच्या घरामध्ये लग्नाची जोरदार धामधूम सुरू झाली होती. मात्र लग्नाच्या दिवशी सकाळीच कोमल गायब झाली. परिसरात सर्वत्र शोधाशोध करूनही कोमलचा थांगपत्ता न लागल्यामुळे अखेर कोमलच्या घरच्या लोकांनी राहुलला फोन कॉल केला होता. त्यावेळी त्याने कोमलबाबत अनभिज्ञ असल्याचे दाखवले.
दोन दिवस उलटूनही कोमल घरी परतली नव्हती. ती गायब झाल्यामुळे सोशल मीडियात पोस्ट करून शोध घेण्याबाबत आव्हान करण्यात आले. त्यानंतरही थांगपत्ता लागला नाही. पोलिसांनी कोमलच्या मोबाईलवरील कॉल रेकॉर्ड तपासले असता तिला शेवटचा कॉल राहुलने केल्याचे उघड झाले. राहुलच्या फोननंतर सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कोमल घराबाहेर पडली. पोलिसांनी राहुलला ताब्यात घेत त्याला खाकी दंडुक्याचा इंगा दाखवला. त्यानंतर राहुलने हत्येच्या गुन्ह्याची कबुली दिली.
राहुलची तीन वर्षांपूर्वी इलेक्ट्रॉनिक दुकानाच्या आवारात कोमलशी भेट झाली होती. सुरुवातीला मैत्रीमध्ये दोघे एकमेकांच्या संपर्कात आले आणि त्यानंतर त्यांचे प्रेम जुळले. राहुलच्या आई-वडिलांचा या प्रेमविवाहाला तीव्र विरोध असल्याने राहुल कोमलसोबत लग्न करण्यास इच्छुक नव्हता. कोमल मात्र राहुलवर लग्नासाठी दबाव टाकत होती. एकीकडे आई-वडिलांचा असलेला तीव्र विरोध आणि दुसरीकडे प्रेयसी कोमलने घातलेला लग्नाचा घाट याला वैतागून राहुलने कोमलची हत्या केल्याचे कबूल केले आहे.