आग्रा : नशेच्या आहारी गेलेल्या मुलाने आपल्या आईच्या डोक्यात वरवंटा घालून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील आग्रा येथे घडली आहे. आईच्या हत्येनंतर बहिणीला व्हिडिओ पाठवला. या व्हिडिओत तो आपली काही चूक नाही म्हणत काही लोकांची नावे घेत आहे. मात्र व्हिडिओत उल्लेख केलेल्या लोकांचा या हत्येशी काहीही संबंध नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. आरोपी मुलगा फरार असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. शिवम बिंदल असे आरोपी मुलाचे नाव आहे.
आग्रा येथील जगनेर कोतवाली परिसरात सुभाष बिंदल हे आपल्या कुटुंबासमवेत राहतात. बिंदल यांचे घराजवळ बिल्डिंग मटेरियलचे दुकान आहे. सुभाष बिंदल हे बुधवारी काही कामानिमित्त आग्रा येथे गेले होते. यावेळी घरी पत्नी सुनीता आणि मुलगा शिवम दोघेच होते. बिंदल यांची मुलगी बंगळुरुत राहते तर दुसरा मुलगा दिल्लीत आयटीआय शिकत आहे.
बिंदल यांनी दुपारी पत्नीला फोन केला, मात्र पत्नीने फोन उचलला नाही. मग त्यांनी शिवमला फोन केला असता त्याचा फोन बंद होता. यानंतर बिंदल यांनी आपल्या मुलीला आणि दिल्लीत राहत असलेल्या मुलाला फोन केला. तसेच शेजाऱ्यांना फोन करुन घरी जाण्यास सांगितले. शेजारी घरी पहायला गेले तर दरवाजाला टाळं होतं.
सुभाषच्या सांगण्यानुसार पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दरवाजा तोडून पाहिला असता आत सुनीता बिंदल या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्याआढळल्या. तसेच बाजूला वरवंटा पडला होता आणि मुलगा शिवम फरार होता. यावरुन पोलिसांनी शिवमनेच आईची हत्या केल्याचा कयास लावला.
पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला असता पोलिसांना व्हिडिओची माहिती मिळाली. शिवमने आपल्या बहिणीला हा व्हिडिओ पाठवला होता. यात तो आपली काही चूक नसल्याचे म्हणत होता. तसेच रितिक बिंदल, गुड्डू बिंदल, मोनू पंडित आणि छोटू यांची सर्व चूक असून या लोकांनी हत्येचा कट रचला आणि रितिकने लूट केली, असे म्हटले आहे. मात्र पोलिसांनी या लोकांचा हत्येशी काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, आरोपीने असे का केले याबाबत अद्याप ठोस माहिती मिळू शकली नाही. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपीला अटक केल्यानंतरच हत्येचा उद्देश स्पष्ट होईल. आरोपी याआधीही तुरंगवास भोगून आला आहे.