महिलेने पुरुषाच्या कानाचा लचका तोडला, कारण अचंबित करणारे
एका महिलेले पुरुषाच्या कानाचा चावून तुकडा पाडल्याची घटना घडली आहे. या महिलेने पुरुषाच्या कानाची पाळी तोडून ती गिळल्याचाही विचित्र प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.
उत्तर प्रदेश | 10 मार्च 2024 : रागाच्या भरात मनुष्य आणि जंगली प्राण्यात काही अंतर राहात नाही. किंबहुना जंगली प्राण्यांचे तरी काही नियम असतात. परंतू मानव कुठल्या थराला पोहचेल याचा काही नेम नाही. उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका महिलेने शुल्लक कारणातून तिच्या भाडेकरुच्या कानाचा लचकाच तोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या पुढील बाब तर आणखीनच भयानक आहे. त्या भाडेकरुने त्याच्या कानाचा तुकडा परत मागितला तर तिने तो तुकडाच गिळून टाकल्याचा सुन्न करणारा प्रकार घडला आहे.
न्यू आग्रा येथील नगला पदी देवी नगरातील ही घटना आहे. या रवींद्र यादव यांच्या घरात अनेक भाडेकरु भाड्याने राहतात. याच ठिकाणी रामवीर आपल्या कुटुंबासह भाड्याने राहातो. गुरुवारी सकाळी रामवीर याच्या मुलाची परीक्षा असल्याने तो त्याला सकाळी सहा वाजता घाई घाईत ई-रिक्षाने आपल्या मुलाला सोडायला गेला. त्यावेळी त्याच्याकडून घराचे गेट चुकून उघडे राहीले. त्याच वेळी तेथेच भाड्याने राहणारे संजीव आणि त्याची पत्नी रेखा यांनी पाहीले की बिल्डींगचा दरवाजा उघडा आहे. तेव्हा त्यांच्या रागाचा पारा चढला. दोघा जणांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याच वेळी रामवीर घराकडे परतला. तर त्याला पाहून दोघेही जण त्याला गेट उघडे ठेवल्याबद्दल जाब विचारू लागले.
कानाचा चावा घेतला
रामवीर हा घरात येताच दोघेही त्याला जाब विचारत त्याच्या अंगावर धावून आले. शब्दाला शब्द वाढत गेला आणि त्यांच्यात प्रचंड भांडण झाले. महिलेने रामवीर याच्या कानाचा चावा घेतला. आणि त्याचा कान सोडायलाच ती तयार होईना. त्यामुळे वेदनेने रामवीर याच्या जीवाची घालमेल झाली आणि त्याने मदतीसाठी ओरडायला सुरुवात केली. रामवीराचा आवाज आणि विव्हळणे ऐकून शेजारीपाजारी जमा झाले. लोकांनी महिलेला त्याचा कान सोडण्याची विनंती केली. तेव्हा तिने त्याचा कान सोडला. त्यावेळी उपस्थित लोकांनी रामवीरला उपचारासाठी त्याच्या कानाची तुटलेली पाळी मागितली. मात्र महिलेने ती कानाची पाळीच गिळून टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. सध्या पोलिसांनी तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरु आहे.