विवेक गावंडे, यवतमाळ : वडिलोपार्जित घराच्या जागेच्या हिस्स्यावरुन दोन तरुणांची हत्या केल्याची धक्कादायक घटना यवतमाळमध्ये उघडकीस आली आहे. यवतमाळ ते कोळंबी फाटा दरम्यान आढळलेल्या दोन अनोळखी मृतदेहांची ओळख पटवण्यास पोलिसांना यश आले आहे. अविनाश हनुमंत कटरे आणि उज्वल नारायण छापेकर अशी मयत तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी विकास रामचंद्र हौसकर यांच्या फिर्यादीवरुन यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलीस त्यांची सखोल चौकशी करत आहेत.
आरोपींची ओळख पटताच पोलिसांनी तात्काळ पाच पथकं गठीत करुन प्रकरणाचा तपास सुरु केला. तपासादरम्यान पोलिसांना अविनाश कटरे याचा पाटापांगरा गावातील वडिलोपार्जित घराच्या जागेवरुन चुलत भावाशी वाद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गावात दाखल होत चौकशी केली असता अविनाश कटरे आणि त्याचा मित्र उज्वल छापेकर हे दोघे गावात आल्याचे कळले. तसेच जागा खाली करण्यावरुन त्यांचा चुलत आजीसोबत वाद आणि धक्काबुक्की झाल्याचेही पोलिसांना कळले. यानंतर अविनाश आणि उज्वल दोघेही यवतमाळकडे गेले.
पोलिसांनी अविनाशचा चुलत भाऊ विकासची माहिती काढली असता तो ही यवतमाळ, गळवा येथे गेल्याची माहिती मिळाली. यामुळे संशयाची सुई विकासवर असल्याने पोलिसांनी गळवा गाव गाठत विकासला ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत विकासने जागेच्या वादातून आपल्या दोन मित्रांच्या मदतीने अविनाश आणि त्याच्या मित्राची हत्या केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. विकास लालचंद कटरे, भारत दिगंबर गाडेकर आणि गजानन रामराव मोरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.