यवतमाळ : जिल्ह्यात हत्येचं सत्र थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. क्षुल्लक कारणातून हत्या करण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशीच एक घटना शुक्रवारी रात्री यवतमाळमधील स्टेट बँक चौकात घडली. पूर्ववैमनस्यातून एका तरुणाला भररस्त्यात टोळक्याने भोसकले. चेतन बाबाराव चित्रीव असे मयत तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्ययात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात 42 हत्या झाल्या आहेत. भररस्त्यात, दिवसाढवळ्या घडणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मयत चेतन हा 9.30 वाजण्याच्या सुमारास शहरातील स्टेट बँक चौकात उभा होता. यावेळी एक टोळकं तेथे आलं आणि त्यांनी तरुणाशी वाद घालण्यास सुरुवात केली. वादावादीनंतर टोळक्याने धारदार शस्त्राने चेतनवर वार करुन पसार झाले. या हल्ल्यात चेतन गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे चौकात एकच हल्लकोळ माजला. व्यापारी दुकानं बंद करुन घरी पळाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक रवाना झाले. विशेष म्हणजे घटनेच्या अर्धा तासापूर्वी पोलिसांनी चौकात गस्त घातली होती. पोलीस निघून गेल्यानंतर काही वेळातच ही घटना घडली. चेतना काही दिवसांपूर्वी आरोपींसोबत काही कारणातून वाद झाला होता. याच वादातून ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते. पुढील तपास पोलीस करत आहेत.