भारताच्या 5 खतरनाक लेडी डॉन, कुणी घातली नेहरू यांना लग्नाची मागणी तर कुणी केलं 21 ठाकुरांना ठार
काही जणी स्वतःवर झालेल्या अत्याचार, अन्यायाविरोधात पेटून उठल्या. त्यामुळेच त्या या गुन्हेगारी क्षेत्राकडे वळल्या. त्याचे समर्थन करता येणार नाही. पण, त्यांना गुन्हेगारी क्षेत्रात का यावेसे वाटले? काय होती त्यामागची कहाणी? देशातल्या सर्वात 5 खतरनाक लेडी डॉन याची माहिती या लेखात देत आहोत.
बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये डॉन किंवा गँगस्टर हे सहसा पुरुष म्हणून दाखवले जातात. परंतु, वास्तविक जीवनात अंडरवर्ल्ड डॉन हे केवळ पुरुषच नाहीत तर यात अनेक महिलांचाही समावेश आहे. काही काळी आपल्यावर झालेल्या अत्याचाराचा बदल घेण्यासाठी या महिला गुंडगिरी किंवा माफिया टोळ्यांच्या गराड्यात घुसल्या. अशा अनेक भारतीय स्त्रियांची इतिहासाने काळी नोंद ठेवली आहे. ती त्यांच्या निर्दोषतेसाठी नव्हे तर भयंकर आणि अत्यंत धोकादायक म्हणून. यातील काही जणी स्वतःवर झालेल्या अत्याचार, अन्यायाविरोधात पेटून उठल्या. त्यामुळेच त्या या गुन्हेगारी क्षेत्राकडे वळल्या. त्याचे समर्थन करता येणार नाही. पण, त्यांना गुन्हेगारी क्षेत्रात का यावेसे वाटले? काय होती त्यामागची कहाणी? त्या लेडी डॉन आणि लेडी गँगस्टर्स ऑफ इंडिया यांना सामान्य जनताच नाही तर पोलीस दलातील अनेक बडे अधिकारीही घाबरून असायचे. त्या महिलांच्या नावाचा दराराच असा होता की अनेक जण त्यांना टरकून असायचे. देशातल्या सर्वात 5 खतरनाक लेडी डॉन याची माहिती या लेखात देत आहोत. यातील एका लेडी डॉन हिने तर देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना थेट लग्न कराल का? अशी विचारणा केली होती.
गुजरातची गॉडमदर संतोकबेन सरमनभाई जडेजा
संतोकबेन सरमनभाई जडेजा ही पोरबंदर जिल्ह्यातील कुतियाना शहराची रहिवासी. सर्वसामान्य महिलाप्रमाणे त्यांचे जीवन सुरु होते. मुलांचे संगोपन आणि पती सरमन जडेजा यांच्यासाठी स्वयंपाक करणे इतक्या पुरतेच त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते. पती सरमन जडेजा हे गुजरातच्या गिरणीत मजूर म्हणून काम करत होते. एकदा गिरणीत कामगारांनी संप केला. गिरणी मालकाने संप मोडून काढण्यासाठी स्थानिक गुंडाला कामावर घेतले. तो गुंड आणि कामगार यांच्यात वाद होऊ लागला. एकदा वाद टिकला गेला आणि रागाच्या भरात सरमन जडेजा याच्याकडून त्या गुंडाची हत्या झाली. या हत्येमुळे तो कामगारांचा लेबर बॉस डॉन झाला. त्याच्या नावाने परिसरातील लोक थरथर कापू लागले.
1986 मध्ये सरमन जडेजा याने स्वाध्याय चळवळीच्या पांडुरंग शास्त्री यांच्या प्रभावाखाली येऊन गुन्हेगारी जगाला अलविदा केले. पण, त्याचा भूतकाळ त्याला सोडत नव्हता. डिसेंबर 1986 मध्ये कला केशव टोळीने जुन्या वैमनस्यातून सरमन जडेजा याची गोळ्या घालून हत्या केली. एवढेच नाही तर पत्नी संतोकबेन हिच्यासह मुलांनाही जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. संतोकबेन या घटनेमुळे हादरल्या. पतीला गमावले होतेच. पण, मुलांचा जीव वाचविण्यासाठी त्यांनी हातात शस्त्र घेतले. पतीच्या काही जुन्या मित्रांना सोबत घेऊन त्यांनी स्वतंत्र टोळी तयार केली. संतोकबेनची नजर पतीची हत्या करणाऱ्यांचा शोध घेऊ लागली. तिने त्यांना शोधून काढले आणि पतीची हत्या केल्याचा संशय असलेल्या 14 जणांची तिने हत्या केली. या हत्येमुळे संतोकबेन हिचा दबदबा वाढला. पोरबंदरच्या गुन्हेगारी कारवायांमध्ये ती महत्त्वाची भूमिका बजावू लागली. संतोकबेन आणि तिच्या टोळीतील सदस्यांवर एक दोन नव्हे तर तब्बल 500 हून अधिक गुन्हे दाखल झाले. गुन्हेगारी जगतामध्ये तिला गॉडमदर म्हणून ओळखले जाऊ लागले.
गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यात त्यांचा दबदबा होता. त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याचे ठरवले. 1990 मध्ये त्यांनी जनता दलाच्या तिकिटावर कुतियाना मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविली. ही निवडणूक जिंकून गुजरात विधानसभेत पोहोचणाऱ्या त्या पहिल्या लेडी डॉन ठरल्या. 1990 ते 1995 पर्यंत त्यांनी कुटियाना विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. डिसेंबर 2002 मध्ये त्यांनी पुन्हा त्याच मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. पण, काँग्रेस उमेदवाराला पाठींबा देत त्यांनी अर्ज मागे घेतला.
2005 मध्ये पोरबंदर नगरपालिकेचे नगरसेवक केशू ओडेदरा यांची हत्या झाली. या हत्येप्रकरणी संतोकबेन यांचे नाव पुढे आले. 2007 मध्ये संतोकबेनची मेहुणी अरसी जडेजा हिचा मुलगा नवघन अरसी याची हत्या आणि 2008 मध्ये करण जडेजा याने पत्नीला गोळ्या घालून ठार केले. या दोन घटनांमुळे संतोकबेन यांचे नाव पुन्हा चर्चेत आले. संतोकबेन यांच्या टोळीत सुमारे 100 हून अधिक जणांचा समावेश होता. त्यापैकी बहुतांश सदस्य हे मेर समुदायातील होते. 1980 च्या दशकात सुरू झालेल्या या महिला लेडी डॉनचा प्रवास त्या राजकोटला येईपर्यंत सुरु होता.
22 डॉन एकत्र करणारी जेनाबाई दारूवाली
1920 चा तो काळ… मुंबईतला डोंगरी भाग त्यावेळी स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख केंद्र बनले होते. महंमद अली रोडवरच्या डोंगरीतील एका चाळीत राहणाऱ्या कुटुंबात जेनाबाई हिचा जन्म झाला. स्वातंत्र्यलढा सुरु होता. सर्व जातीधर्माचे स्त्री पुरुष त्यात सामील होत होते. या चळवळीत जेनाबाई सुद्धा सामील झाली होती. गांधीजी आणि स्वातंत्र्य चळवळीची ती एक खंदी समर्थक होती. शाळेत जात नसल्याने ती या रस्त्यावरच्या स्वातंत्र्य लढ्यात उतरली होती. जेनाबाई चौदा वर्षांची असताना तिचा विवाह मोहमद शाह दरवेश याच्यासोबत झाला. त्यांना एकूण पाच अपत्ये झाली.
देश स्वातंत्राच्या उंबरठ्यावर होता. अशातच हिंदू मुस्लिम दंगल उसळू लागला. या दंगलीत ती हिंदूंना संरक्षण देत असे यावरून नवरा तिला बेदम मारहाण करत असे. फाळणीनंतर नवऱ्याने पाकिस्तानला जाण्याचा विचार संगीता. पण, जेनाबाई हिने मुंबईतच राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जेनाबाई आणि पाच मुलांना सोडून तिचा नवरा पाकिस्तानला निघून गेला. मुलांचे पोट भरण्यासाठी ती दानाबाजारामध्ये चढ्या भावाने धान्य विकणारे दुकानदार आणि घाऊक धान्यविक्रेते यांच्यासाठी दलाल म्हणून काम करू लागली. हळूहळू तिचा धान्याच्या काळाबाजाराचा व्यवसाय वाढला. पण, पुढे तिने तत्कालीन मद्यविक्रेता वरदराजन याच्यासोबत ओळख वाढवली. आता ती दारूचा काळाबाजार करू लागली. त्यामुळे ती जेनाबाई दारूवाली म्हणून ओळखली जाऊ लागली.
वरदराजन याने जेनाबाई हिची ओळख तेव्हाचा डॉन हाजी मस्तान याच्यासोबत करून दिली. हाजी मस्तान याचा तिने विश्वास संपादन केला. हाजी मस्तान तिला ‘आपा’ नावाने हाक मारत. मुंबईत जितके मोठे गुन्हेगार होते त्यांच्यावर तिने पकड ठेवली होती. तिची कोणतीही टोळी नव्हती पण मोठ मोठे गुंड तिचा मान राखत. अनेकदा करीम लाला, हाजी मस्तान यासारखे मोठे अंडरवर्ल्ड गुंड, गुन्हे शाखेचे अधिकारी तिच्या मुंबईतील नागपाडा येथील घरी जात असत.
मुंबईतील वर्चस्व कुणाचे? यासाठी लहान मोठी टोळीयुद्धे सुरु झाली होती. हाजी मस्तान या त्रासाला वैतागले होते. त्याला सगळे बेकायदेशीर धंदे बंद करायचे होते. त्याने जेनाबाई हिला बोलावून सगळे सत्य सांगून हे सगळं थांबवण्याची जबाबदारी दिली. त्यावेळी दाऊद इब्राहिम याचेही वर्चस्व वाढत होते. दाऊद इब्राहिम तिला मावशी मानायचा. त्यामुळे तिने पठाण टोळी आणि दाऊद टोळी यांच्यात सर्वात मोठा समेट घडवून आणला. त्यामुळे मस्तानच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण झाले होते.
जेनाबाई दारूवाली हिने मक्कामध्ये तब्बल 22 डॉन यांना एकत्र आणून त्यांच्यात समेट घडवून आणला होता. याचे कारण म्हणजे मुंबईत जितक्या तोलाय होत्या त्याचे प्रमुख अंडरवर्ल्डची सगळ्यात महत्वाची बाई मानत असत. डोंगरातील सगळ्यात महाधूर्त बाई म्हणून जेनाबाई दारुवाली कुप्रसिद्ध होती. 1993 मध्ये मुंबईत हिंदू मुस्लीम दंगल उसळली. दंगलीतला रक्तपात पाहून तिचे मन द्रवले. डोंगरी येथे एकीकडे मशिदी आणि दुसरीकडे मंदिर असलेल्या गल्लीच्या मध्यात हातात पांढरा झेंडा घेऊन ती दोन समाजामधल्या लोकांना शांत करण्याचे आवाहन करत उभी राहिली होती. 1993 च्या बॉम्बस्फोटामुळे ती खूप व्यथित झाली होती. त्यातच तिला आजारपणे आले आणि नंतर काहीच दिवसांतच तिचा मृत्यू झाला.
डॉन दाऊद इब्राहिमची बहिण हसीना ‘आपा’
नागपाड्यात वाढलेल्या एका लहान मुलीपासून, चार मुलांची आई आणि नागपाडाची गॉडमदर अशी तिची कहाणी बदलत गेली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची धाकटी बहीण हसीना पारकर हिला अंडरवर्ल्ड ‘हसीना आपा’ याच नावाने ओळखतात. 2014 मध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने तिचे मुंबईत निधन झाले. पण, आजही ‘हसीना आपा’ हे नाव समोर आले की लोक थरथर कापतात.
हसिना पारकर हिचा विवाह इस्माईल पारकर यांच्याशी झाला. त्यांना दानिश आणि अलीशाह अशी दोन मुले झाली. यातील दानिश हा दाऊदचा आवडता भाचा होता. दाऊद इब्राहीम याने अंडरवर्ल्डमध्ये पाऊल ठेवेल. मुंबईत त्याचा प्रमुख प्रतिस्पर्धी दगडी चाळीतील अरुण गवळी होता. या दोन्ही टोळ्यांचा संघर्ष सुरु होता. यात गवळी टोळीकडून दाऊदचा मेव्हणा इस्माईल पारकर मारला गेला आणि येथूनच हसीना पारकर यांचा गुन्हेगारी जगताशी पहिला संबंध आला. दाऊद याने मेहुणा इस्माईल याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी जे जे हॉस्पिटलमध्ये गवळी शूटर्सची हत्या करण्यासाठी आपले शार्पशूटर पाठवले. 1991 मध्ये ‘जेजे हॉस्पिटल शूटआऊट’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या घटनेने मुंबईत हाहाकार माजवला. 1986 मध्ये दाऊद दुबईला पळून गेला होता. पण, त्याची मुंबईतील सारी सूत्रे हसिना आपा सांभाळत होती. त्यामुळे हा हल्ला हसिना आपा हिच्याच सांगण्यावरून झाला होता अशी चर्चा आहे.
नागपाडा पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या दिमतीमकर मार्गावरील गॉर्डन हाऊस या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर हसीना आपाचा दरबार भरत असे. दाऊद या नावाच्या दहशतीमुळे आपाचा शब्द प्रमाण मानला जाई. त्यावेळी मुंबईमध्ये बांधकाम व्यवसायाने जोर धरला होता. ‘प्रोटेक्शन मनी’च्या नावाखाली गँगस्टर्स बड्या बिल्डर्सकडून पैसे उकळत होते. झोपड्या आणि चाळी याचा पुनर्विकास करण्यावर नवख्या बिल्डर्सचे लक्ष होते. त्या बिल्डर्सना झोपडीधारक आणि चाळकर्यांची संमती मिळवून देण्यात हसीना आपाचा हातखंडा होता. दक्षिण मुंबईपासून वांद्रे आणि कुर्ल्यापर्यंत जवळजवळ कोणतीही इमारत तिच्या संमतीशिवाय बांधता येत नव्हती इतकी तिची दहशत होती. भारतातून मध्य पूर्व आशियात हवालाच्या माध्यमातून पैशाची देवाणघेवाण करणे हा सुद्धा तिचा आणखी एक व्यवसाय होता.
21 ठाकुरांचा संहार करणारी चंबळच्या खोऱ्यातील डाकूराणी फुलनदेवी
एका गरीब घरातली, शेतात काम करणारी मुलगी हातामध्ये बंदूक घेते तब्बल 21 ठाकुरांचा खून करते. या गोष्टीला समाज कसा जबाबदार आहे हे फुलनदेवी हिच्या कहाणीमधून अधोरेखित होते. 10 ऑगस्ट 1963 देशात वसंतोत्सव सुरु होता. या दिवशी जन्म झाला म्हणून आईवडील लाडाने तिचे नाव फुलन ठेवतात. वडील खूपच गरीब तर आई कडक शिस्तीची. तीन बहिणी आणि एक भाऊ अशा चार भावंडात फुलन दोन नंबरची. फुलनच्या वडिलांची शेतजमीन त्यांच्या सख्या भावाने कपटाने बळकावली होती. आर्थिक परिस्थिती खूपच बिकट असल्याने त्यांना कधी कधी उपाशीही रहावे लागत असे.
फुलन घरातील सगळी कामे करायची. दुसऱ्यांच्या शेतात राबायची. वडिलांसोबत गवंडी काम करायची. मोठ्या बहिणीचे लग्न झाले. तिच्या पाठोपाठ फुलन हिचेही वयाच्या 11 व्या वर्षी लग्न झाले. तिचा नवरा तिच्या वडिलांच्या वयाच्या पुट्टीलाल याच्यासोबत झाले. लग्नानंतर त्याने तिचे यौनशोषण केले. तिचा मानसिक, शारिरीक छळ सुरु केला. त्याच्या त्रासामुळे फुलन दोन तीन वेळा पळून माहेरी आली. पण, घरच्यांनी पुन्हा तिला पतीकडे पाठवले. पण, काही दिवसांनी नवऱ्याने तिला एका बोटीवर सोडले आणि तिथून सोडून पळाला. नवऱ्याने सोडल्यानंतर ती गावी परत आली. पण, तिथे तिला गावकरी हिणवू लागले. गावचे सरपंच, पाटील, तिचा चुलत भाऊ तिला धमकावू लागले.
फुलन 15 वर्षाची झाली होती. गावच्या सरपंचाच्या मुलाची तिच्यावर नजर गेली. त्याने तिच्यावर बळजबरी केली. तिने घरी ही गोष्ट सांगितली. पण, आई वडिलांनी त्याकडे दुर्लक्ष केले. कारण तो सरपंचांचा मुलगा होता. ती पोलिसांकडे गेली. त्यांनीही हात वर केले. काही दिवसांनी ती बहिणीकडे गेली असताना इकडे सरपंच, चुलत भाऊ यांनी ती डाकू असल्याचा आरोप केला. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तिला पकडून जेलमध्ये टाकले. फुलन हिच्या दुर्दैवाचा फेरा इथेच संपल नव्हता. जेलमध्ये असतानाच पोलीस अधिकाऱ्यांनी तिला आपल्या वासनेची शिकार बनवले. त्या अत्याचाराला कंटाळून ती डाकू असल्याचे मान्य करते. आई कर्ज कडून तिचा जामीन भरते आणि तिच्या त्या अत्याचारातून सुटका होते.
जेलमधून सुटल्यावर फुलन गावी येते. पण, सरपंच आणि चुलत भाऊ तिला मारण्यासाठी बाबू गुज्जर नावाच्या डाकूला सुपारी देतात. बाबू गुज्जर तिच्यावर बलात्कार करतो. मात्र, त्यांच्यातीलच विक्रम मल्लाह नावाचा डाकू बाबू गुज्जरला ठार करतो आणि फुलनला वाचवतो. काही दिवसांनी तो तिच्याशी लग्न करतो. विक्रम मल्लाह याचा मित्र असलेला डाकू श्रीराम ठाकूर हा त्याला ठार मारतो. फुलनची गावातून नग्न धिंड काढतो. अनेकांना तिच्यावर अत्याचार करायला लावतो. एका बंद खोलीत कोंडून ठेवतो. परंतु, एका ब्राह्मण व्यक्तीच्या सहय्याने फुलन पळून जाते. तिच्या मनात आग धुमसत असते. काही दाकुना सोबत घेऊन ती नवी टोळी बनवते. श्रीराम याने केलेल्या अत्याचाराचा सूड घेण्यासाठी ती त्याला शोधाते आणि श्रीरामसह स्वतावर अत्याचार केलेल्या गावामधील 22 ठाकूरांना गोळ्या घालून ठार करते. त्यानंतर ती सरपंच, पाटील आणि चुलतभाऊ यांनाही ठार करते.
फुलनदेवी एका रात्रीत देशभरात चर्चेचा विषय ठरते. सरकार तिला पकडण्यासाठी एक लाखाचे बक्षीस जाहीर करते. पण, ती हाताला लागत नाही. अखेर ती आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेते. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री अर्जुनसिंह यांच्यासमोर 12 फेब्रुवारी 1982 रोजी ती आत्मसमर्पण करते. 1994 मध्ये तिच्यावरील सर्व आरोप माफ होतात. जेलमधून मुक्त होते. 1996 साली समाजवादी पक्षाकडून ती मिर्झापूरची खासदार म्हणून निवडून संसदेत जाते. 1999 साली पुन्हा ती खासदार म्हणून निवडून येते. पण, 25 जुलै 2001 रोजी दिल्लीत तिची हत्या होते. फूलनदेवी हिच्या आत्मसमर्पणानंतर चंबळच्या खोऱ्यात डाकूंच्या टोळ्यांची दहशत हळूहळू संपुष्टात आली.
नेहरुंना लग्न कराल का विचारणारी बेधडक गंगूबाई काठियावाडी…
साठच्या दशकात मुंबईच्या कामाठीपुऱ्यात वेश्या व्यवसायावर हुकमत गाजवणाऱ्या गंगा हरजीवनदास काठेवाडी उर्फ गंगूबाई हे नाव खूपच चर्चेत आहे. गंगूबाई ही हिंसक गँगस्टर नव्हती. ती कुंटणखाना चालवायची. शिक्षणतज्ज्ञ, वकिलांची परंपरा असलेल्या गुजरातच्या काठियावाडमधल्या एका चांगल्या घरातली ही मुलगी कुंटणखान्याकडे कशी वळली? काय आहे तिची कहाणी?
गुजरातच्या काठेवाडी गावच्या गंगा हिचे लहानपणापासून मुंबईला जाऊन हिरोईन बनण्याचे तिचे स्वप्न होते. वडिलांकडे रामनिक लाल नावाचे अकाऊंटंट होते. 16 वर्षाची गंगा त्याच्या प्रेमात पडते. मुंबईला नेऊन तुला अभिनेत्री करणारच या त्याच्या आश्वासनाची त्याला भुरळ पडते. गंगा त्याच्याबरोबर लग्न करते आणि ते दोघे मुंबईला पळून येतात. काही दिवस त्यांच्या प्रेमाचा बहार सुरु असतो. एके दिवशी रामनिक तिला कामाठीपुऱ्यात नेते आणि अवघ्या 500 रुपयात तिची विक्रि करतो. कामाठीपुऱ्यात आल्यानंतर आपला परतीचा मार्ग बंद झाल्याचे तिच्या लक्षात येते. कुटुंबाकडेही परत जाऊ शकत नाही अशा तिची अवस्था होते. नशिबात आलेली परिस्थिती स्वीकारते आणि गंगा आता गंगूबाई होते.
गंगूबाईकडे शौकत खान नावाचा एक पठाण दररोज आपल्या वासनेची भूक भागविण्यासाठी यायचा. तो तिच्यावर जबरदस्ती करायचा. एकदा तर त्याने कहर केला. त्याने शारीरिक इजा तर केलीच शिवाय पैसेही दिले नाहीत. शारीरिक इजा झाल्यामुळे गंगुबाई यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले होते. त्यांनी त्या पठाणाची माहिती काढली. तो पठाण कुख्यात गँगस्टर करीम लाला याच्या गँगमधील असल्याची माहिती त्यांना मिळाली. गंगूबाई यांनी करीमलाला यांची भेट घेऊन आपल्यावरील आपबीती सांगितली. पुढच्यावेळी शौकत खान कोठ्यावर आला असता करीमलालाने त्याला चोप देऊन तिथून हुसकावून लावले. त्याचक्षणी गंगुबाई यांनी त्यांना राखी बांधून भाऊ मानले. या एका घटनेमुळे कामाठीपुरा परिसरात गंगुबाईंचा दरारा वाढला.
कामाठीपुऱ्यातल्या ‘घरवाली निवडणुक’ गंगूबाई यांनी लढविली आणि त्या जिंकल्या. त्यामुळे त्यांना गंगुबाई काठेवाली म्हटले जाऊ लागले. गंगूबाई कोणत्याही मुलीला तिच्या इच्छेविरूद्ध कोठ्यावर काम करायला घ्यायची नाही. तिने कधीही तरुण मुली आणि महिलांचे शोषण केले नाही. कामाठीपुरा येथील महिला, मुली आणि मुले यांना ती स्वतःच्या मुलांप्रमाणे जपत असे. ती त्यांची आईसारखी काळजी घेत होती. कुंटणखाने चालवणाऱ्या मॅडमवर त्यांचा दरारा असे. गंगुबाई हिला आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागला. पण, स्पष्ट आणि सर्व सेक्स वर्कर्सच्या भल्यासाठी काम करण्याचा त्यांचा दृढनिश्चय होता. सोनेरी किनारीची पांढरी साडी, सोनेरी बटणांचा ब्लाऊज, सोनेरी काड्यांचा चष्मा अशा वेशात गंगुबाई कारमधून फिरत.
1960 च्या दशकात कामाठीपुरा परिसरात सेंट अँथनीज गर्ल्स हायस्कूल उभे राहिले. वेश्यांमुळे तरुण मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होईल असे सांगत रेड लाईट एरियचा काही भाग रिकामा करण्यात यावा, अशी मागणी पुढे येऊ लागली. यामुळे अनेक महिलांच्या पोटापाण्यावर गदा येणार होती. मोठे आंदोलन झाले. वेश्याव्यवसाय हा गुन्हा नाही. ती एक सामाजिक गरज आहे. वेश्याव्यवसाय करणारी महिला बदफैली असते अशी ओरड करणाऱ्यांना त्यांनी ‘मी घरवाली आहे घर तोडणारी नाही’ असे ठणकावत त्यांनी वेश्यांचा आवाज पहिल्यांदाच सामाजिक पटलावर आणला.
गंगुबाई यांनी आपल्या काही राजकीय ओळखींच्या मदतीने तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहर यांच्या भेटीची वेळ मिळवली. या भेटीत त्यांनी देशातील सेक्स वर्करना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत चर्चा केली. नेहरू यांनी त्यांना स्वतःसाठी चांगली नोकरी किंवा नवरा मिळवणे शक्य असताना या व्यवसायात का आल्या, असे विचारले. त्यावर गंगुबाई यांनी थेट नेहरू यांचा लग्नाचा प्रस्ताव दिला. नेहरू यांनी त्यांना यावरून समज दिली. पण, त्या शांतपणे म्हणाल्या, ‘प्रधानमंत्रीजी ‘चिडू नका. मला माझा मुद्दा दाखवून द्यायचा होता. सल्ला देणे सोपे असते. पण, त्याच स्वीकार करणे कठीण असते.’ गंगुबाई यांच्या या बैठकीचा फायदा झाला आणि कामाठीपुऱ्यातून वेश्यांना बाहेर काढण्याचा बेत बारगळला.