नाशिक : नाशिक शहरातील (Nashik) मिर्ची हॉटेल चौफुली येथे ट्रक आणि खाजगी बसचा भीषण अपघात (Bus Accident) झाला होता. त्यात 12 जणांचा मृत्यू तर 31 जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेने संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जात होती. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या (NMC, RTO, Police) कारभारावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. वारंवार अपघात घडणाऱ्या ठिकाणीच अपघात झाल्याने प्रशासनाचा निष्काळजीपणा देखील समोर आला होता. याच ठिकाणी स्पीडब्रेकरची मागणी देखील करण्यात आली होती. मात्र, नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्या निवेदनाला प्रशासनाने केराची टोपली दाखवली होती. याशिवाय प्रादेशिक परिवहन विभागाच्या तपासणीवर देखील अनेक सवाल उपस्थित झाले होते. त्यानंतर प्रशासनाने याबाबत धडा घेतल्याचे दिसून येत आहे.
नाशिकच्या वेशीवरच खाजगी बसेसची संयुक्त पथकाच्या माध्यमातून तपासणी केली जात आहे. अवैध प्रवाशांची वाहतूक करणाऱ्यांना आर्थिक दंड ठोठवला जात आहे.
अवैध वाहतूक करणाऱ्यांवर पोलीस प्रशासन, प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त पथकाची स्थापना यासाठी करण्यात आली असून 76 हजाराहून अधिकचा दंड ठोठावला आहे.
अवैध वाहतुक करणारी एक बसच प्रादेशिक परिवहन विभागाने जमा करून घेतली आहे, त्यामुळे खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालक-मालक यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
नाशिक पोलीस आयुक्तालय येथील हॉलमध्ये प्रादेशिक परिवहन, पोलीस प्रशासन, खाजगी प्रवासी चालक मालक यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती.
त्यात अवैध प्रवासी वाहतूक केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल अशी सूचना वजा देण्यात आली होती, नियमात राहूनच प्रवासी वाहतूक करा नाहीतर कारवाईला सामोरे जा अशी सूचना यावेळी करण्यात आली आहे.
दिंडोरीरोड जकातनाका, पेठरोड, शिलापुर टोलनाका, शिंदे-पळसे टोलनाका, ९ वा मैल, मुंबई-आग्रा गौळाणे फाटा या सहा ठिकाणी ही पथके कार्यरत असणार आहे.