Cyber Police : ऑनलाइन झटपट कर्ज देऊन फसवणूक करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात, पाच राज्यातून 14 जणांना अटक
पोलिसांनी ज्यावेळी आरोपींना अटक केली, त्यावेळी 39 मोबाईल फोन, 211 सिमकार्ड, 19 लॅपटॉप, दोन हार्ड डिस्क आणि तीन राऊटर जप्त करण्यात आले आहेत.
मुंबई – सायबर पोलिसांनी (Cyber Police) एका टोळीचा पर्दाफाश केला. पोलिसांनी या टोळीतील 14 जणांना अटक केल्याचे सांगण्यात येत आहे. तात्काळ ऑनलाइन कर्ज (Online Loan) देऊन लोकांना त्रास दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यासाठी त्यांनी मोबाईल अॅप्लिकेशनचा वापर केला. मुंबई पोलिसांच्या (Mumbai police) गुन्हे शाखेचे सहआयुक्त सुहास वारके यांन मीडियाला दिलेल्या माहितीनूसार सायबर पोलिसांनी 14 कोटी रुपये रोख आणि 2.17 लाख डॉलर्सच्या क्रिप्टोकरन्सी असलेल्या 350 बँक खात्यांचे व्यवहार ब्लॉक केले आहेत. मागच्या अनेक दिवसांपासून पोलिसांकडे ऑनलाईन अॅपच्या माध्यमातून फसवणूक केल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्या अनुशंगाने पोलिसांनी माहिती घेतली असता सगळं प्रकरण उघडकीस आलं आहे.
अशी करायचे फसवणूक
पोलिसांनी ज्यावेळी आरोपींना अटक केली, त्यावेळी 39 मोबाईल फोन, 211 सिमकार्ड, 19 लॅपटॉप, दोन हार्ड डिस्क आणि तीन राऊटर जप्त करण्यात आले आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, 20 मे रोजी पश्चिम विभागातील सायबर पोलिस स्टेशनमध्ये एका व्यक्तीने फसवणूक आणि छळाची तक्रार केली तेव्हा हे रॅकेट उघडकीस आले. तक्रारदाराने आईच्या उपचारासाठी 10 इन्स्टंट लोन ऍपद्वारे 3.85 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते आणि कर्जाच्या रकमेपोटी 22 लाख रुपये परत केले होते. कर्जाची परतफेड करूनही, त्या व्यक्तीला या कंपन्यांच्या अधिका-यांकडून धमक्या येत राहिल्या, ज्यांनी त्याला सांगितले की ते त्याचे मॉर्फ केलेले चित्र त्याच्या संपर्क यादीतील लोकांना पाठवतील. ते म्हणाले की तपासादरम्यान असे आढळून आले की आरोपी त्यांच्या मालकांशी संपर्क स्थापित करण्यासाठी डिंग टॉक अॅप आणि ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी क्लिक टू चॅट आणि एनएक्स क्लाउड वापरत होते.
आरोपींना बंगळुरू, आंध्र प्रदेश, गुरुग्राम, मुंबई आणि उत्तराखंड येथून अटक
मोबाईल अॅपवर इन्स्टंट लोनसाठी अर्ज करताना अर्जदारांचा सर्व वैयक्तिक डेटा आरोपीच्या कंपनीकडे जात असे. कर्जाची परतफेड न करणाऱ्यांना त्रास देण्यासाठी आरोपींकडून त्याचा वापर केला जात असे. आरोपी कर्ज फेडण्यात अपयशी ठरलेल्या किंवा व्याज न भरणाऱ्या लोकांना अश्लील चित्रे बनवून त्रास देत असे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना बंगळुरू, आंध्र प्रदेश, गुरुग्राम, मुंबई आणि उत्तराखंड येथून अटक करण्यात आली आहे. गेल्या आठवडाभरात ही अटक करण्यात आली आहे.