बालकांच्या तस्करीच्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; महिलेसह तिघांना अटक
चोरीच्या गुन्ह्यात पकडलेली लहान मुले बालसुधारगृहात ठेवली जात असत. मग तस्करांची टोळी त्या मुलांचे पालक असल्याचा दावा करत होती.
उस्मानाबाद : बालसुधारगृहातील लहान मुलांना बनावट आधारकार्ड (Fake Aadhar Card)च्या आधारे पळवून नेणाऱ्या आंतरराज्य तस्कर टोळी (Interstate Trafficking Gang)चा उस्मानाबाद पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील महिलेसह तिघांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 5 बनावट आधारकार्ड आणि 5 मोबाईल जप्त केले आहेत. चोरीच्या गुन्ह्यात पकडलेली लहान मुले बालसुधारगृहात ठेवली जात असत. मग तस्करांची टोळी त्या मुलांचे पालक असल्याचा दावा करत होती. बोगस आधारकार्ड बनवून हा कारनामा केला जात असे आणि नंतर त्या मुलांना घेऊन पळवून जात असे.
उस्मानाबाद शहरातील सांजा चौकात बालसुधारगृह आहे. तेथील मुलाला नेण्यासाठी एक महिला मुलाची आई असल्याचा दिखावा करीत बनावट आधारकार्ड व जन्मदाखला घेऊन आली. त्यावेळी तिच्यासोबत दोन पुरुषही होते. पोलिसांना त्यांच्या हालचालींवर संशय आला. त्यांच्या अधिक चौकशीनंतर आंतरराज्य तस्कर टोळीचा पर्दाफाश झाला आहे.
एकच महिला वारंवार बालसुधारगृहात आली अन् संशय बळावला!
वारंवार एकच महिला मुलांना घेऊन जाण्यासाठी येत असे. प्रत्येक वेळी ती आपण संबंधित मुलाची पालक असल्याचे सांगत असे. ती बनावट आधारकार्ड घेऊन येत असे. त्यामुळे तिच्यावर संशय बळावला.
बालकल्याण समितीने पोलिसांना संपर्क केला
यानंतर बालकल्याण समितीचे अध्यक्ष विजयकुमार माने यांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यावेळी सपोनि अमोल पवार, पोलीस उपनिरीक्षक संदीप ओहोळ, पोलीस अंमलदार साईनाथ आशामोड, वैशाली सोनवणे, रंजना होळकर यांच्या पथकाने छापा मारून एस. लक्ष्मी कृष्णा या महिलेला ताब्यात घेतले.
टोळीतील गुन्हेगार आणि मुले आंध्रप्रदेशच्या करनूल येथील आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके आंध्रप्रदेशमध्ये रवाना झाली आहेत. पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी शनिवारी ही माहिती दिली.
टोळीवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल
या टोळीवर भादंवि कलम 420, 468, 471, 370, 511 व 34 अशा विविध कलमांतर्गत आनंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. असून या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे करीत आहेत.
तिघांना पोलीस कोठडी
टोळीतील तिघांची 5 दिवसांच्या पोलीस कोठडी रवानगी झाली आहे. टोळीतील आरोपी व त्यांनी घेऊन गेलेली मुले यांची डीएनए टेस्ट केली जाणार आहे. त्यानंतर सत्य समोर येईल, असे अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी सांगितले.
जिल्ह्यातील येरमाळा, लोहारा या भागांत काही लहान मुलांना चोरी करताना पकडले होते. त्यांना बालसुधारगृहात ठेवले होते. त्यातील 1 मुलगी आणि 2 मुलांना टोळीने पळवून नेले आहे.
हेल्पलाईन लवकरच जारी करणार
जिल्ह्यातील लहान मुलांच्या सुरक्षेसाठी पिंक पथक व भरोसा सेल कार्यान्वित केले आहे. तसेच ज्या ठिकाणी छेडछाड होते, रोडरोमियो फिरतात व गर्दी असते असे हॉटस्पॉट शोधले असून त्या ठिकाणी गस्त घालण्यात येत आहे.
तसेच कायमस्वरूपी हेल्पलाईन नंबर जारी केला जाणार आहे. उस्मानाबाद शहरात सीसीटीव्ही बसवण्यास मान्यता मिळाली आहे, असे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी सांगितले.