पहाटेची वेळ सगळे झोपले होते; अचानक आग लागली आणि होत्याचे नव्हते झाले
सकाळी संपूर्ण गाव झोपेत असताना आग सर्वत्र पसरली. शेजारी असणारे दत्ता वानखेडे यांच्या सुद्धा म्हशीच्या गोठ्यालाही आग लागली. त्यांचेसुद्धा लाखाच्या वर नुकसान झाले.
वाशिम : करंजी येथे पहाटे भीषण आग लागली. या आगीत एक-दोन नव्हे तर तब्बल चार कुटुंब उघड्यावर आले. त्यांची गुरढोर होरपळून गेली. गोठे जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. या आगीत 39 बकऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. दहा लाख 51 हजार आठशे रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. करंजी लहाने येथे सकाळी चार वाजता ही आग लागली. दलित वस्तीत, अचानक लागलेल्या आगीत सुधाकर किसन कांबळे यांच्या 39 बकऱ्या असलेल्या गोठा जळाला. आगीने एवढे रुद्र रूप धारण केले की, सकाळी संपूर्ण गाव झोपेत असताना आग सर्वत्र पसरली. शेजारी असणारे दत्ता वानखेडे यांच्या सुद्धा म्हशीच्या गोठ्यालाही आग लागली. त्यांचेसुद्धा लाखाच्या वर नुकसान झाले.
गोठ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
आग तिथे न थांबता बाजूच्या बाळू खंदारे यांच्यासुद्धा घराला लागली. त्यांच्या घरच्या अन्नधान्याची नासाडी झाली. तेथून पुढे शेजारीच राहणारे शेषराव सीताराम खिल्लारी यांच्यासुद्धा गुरांचा गोठा जळाला. त्यांची तिथे ठेवले असलेले तीन स्पिंकलर संच, अंदाजे 90 पाईप व शेतीचे संपूर्ण भांडवल जळून खाक झाले. गावकऱ्यांनी आग विझवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. परंतु, आग आटोक्यात आली नाही. तेव्हा शिरपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमक दलाला पाचारण केले. अग्निशमक दलाने आग विझवून पुढील अनर्थ टाळला.
चार कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त
घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी मालेगावचे तहसीलदार काळे हे दाखल झाले. तसेच तलाठी गणेश बेदरकर, ग्रामसेवक विलास नवघरे, डॉक्टर साळुंखे, जिल्हा परिषद सदस्य सुनील पाटील लहाने, पंचायत समिती सदस्य सिद्धार्थ खिल्लारे, सरपंच आयोध्या दिगंबर खाडे, उपसरपंच गीता दिगंबर खाडे, माजी सरपंच गोपाल पाटील लहाने, माजी सरपंच सुरेश पाटील लहाने आणि गणेश पाटील लहाने व राजू पाटील लहाने यांनी घटनास्थळाला भेट दिली. घटनास्थळाचा पंचनामा करून अंदाजे दहा लाख 51 हजार आठशे रुपये एवढे नुकसान झाले. असे तलाठी गणेश बेदरकर यांनी पंचनामा करताना सांगितले. वरील चार कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्यांनी शासन दरबारी मदतीची याचना केली आहे.