कळंबा कारागृहात शिपायानेच कैद्यांना गांजा पुरवला, 8 पुड्या जप्त, कारागृहाची अब्रू पुन्हा चव्हाट्यावर
कळंबा कारागृहात पुन्हा एकदा कैद्यांकडे गांजा सापडला आहे आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे कारागृहात सुरक्षेसाठी नेमलेल्या शिपायानेच शिक्षा भोगणाऱ्या तीन आरोपींना गांजा पुरविल्याचा प्रकार समोर आला आहे.
कोल्हापूर : कळंबा जेल मधील कैद्यांकडे मोबाईल सापडणं, गांजा सापडणं हा प्रकार आता नित्याचा झाला आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण जिल्हा मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा कैद्यांकडे गांजा सापडला आहे आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे कारागृहात सुरक्षेसाठी नेमलेल्या शिपायानेच शिक्षा भोगणाऱ्या तीन आरोपींना गांजा पुरविल्याचा प्रकार समोर आला आहे.
कैद्यांना शिपायानेच पुरविला गांजा
कारागृहातील तपासणी पथकाला चौघांकडे गांजा सदृश्य अमली पदार्थाच्या पुड्या मिळाल्या. शिपायासह एकूण चौघांवर रात्री जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. इंद्रजीत बलोटिया, छेदीलाल निर्मळ, आणि जगदीश मेहता अशी तिघा कैद्यांची नावं असून शिपाई सतिश गुंजाळ असे गुन्हा दाखल झालेल्या चारही आरोपींची नाव आहेत.
गांजाच्या 8 पुड्या, दीड हजार रुपयांची रोकड जप्त
आरोपींकडून गांजा सदृश्य अंमली पदार्थांच्या छोट्या आठ पुड्या आणि दीड हजार रुपयांची रोकड विशेष पथकाने जप्त केली आहे. कारागृहातील तपासणी पथकाचा झाडाझडती दरम्यान हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे पुन्हा एकदा कुंपणानेच शेत खाल्ल्याची चर्चा आहे.
कैद्यांकडे मोबाईल, गांजा सापडल्याचे याआधीही प्रकार
कळंबा मध्यवर्ती कारागृहात अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी शिक्षा भोगत आहेत. गेल्या काही महिन्यात कारागृहात कैद्यांना मोबाईल पुरविल्याचा तसेच गांजा पुरवण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. कारागृह प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जाते मात्र एक दोन महिने झाले की असे प्रकार समोर येतात. आता यावर ठोस पाऊल उचलणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त होत आहे.
(jail Police Supply Hemp To Accussed kalamba Jail Kolhapur)
हे ही वाचा :
आधी विवाहितेचा मृतदेह, आता वसईतील त्याच बीचवर पुरुषही मृतावस्थेत, हातावर नाव गोंदवलेलं
कोयत्याने वार करत सावत्र आईची हत्या, पुण्यात 17 वर्षीय मुलगा पोलिसांच्या ताब्यात