जळगाव शहरातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. जुन्या वादातून 8 ते 10 जणांनी एका तरूणावर सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून अतिशय बेरेहमपणे त्या तरूणाला मारहाण करून त्याचा जीव घेण्यात आला. या प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ माजली असून दहशतीचे वातावरण आहे. किशोर अशोक सोनवणे असे तरूणाचे नाव असून तो अवघ्या 33 वर्षांचा होता. यामुळे जळगाव शहरवासीय हादरले आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरू आहे.
पाळत ठेवून केला हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील कालिका माता मंदिर परिसरात बुधवारी रात्रीच्या सुमारास हे हत्याकांड घडलं. किशोर अशोक सोनवणे (वय 33) या तरूणाचा हकनाक जीव गेला. 8 ते 10 जणांच्या टोळक्याने त्याच्यावर पाळत ठेवून, नंतर त्याला एकटं गाठून मारहाण केली, धारदार शस्त्राने अंगावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या किशोरचा मृत्यू झाला.
हॉटेलमध्ये जेवायला गेला पण..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर सोनवणे हा रात्री कालिका माता मंदिर परिसरातील हॉटेल भानु येथे जेवणासाठी गेला होता. त्याच्यावर पाळत ठेवत संशयित आरोपींनी इतर तरूणांना बोलावून घेतले. त्यानंतर किशोर हा हॉटेलमध्ये जेवत असतानाच 10.45 च्या सुमारास धारदार शस्त्राने वार करून त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. हल्ल्याचा हा धक्कादायक प्रकार त्या हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
या घटनेची हत्याकाडांची माहिती मिळाल्यानंतर शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी घटस्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या किशोरचा तोपर्यंत मृत्यू झाला होता. पोलिसांनी त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. दरम्यान या हत्याकांडाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यामध्ये संशयित आरोपी हॉटेल मध्ये प्रवेश करून तरुणाला बेगम मारहाण करताना दिसत आहेत. त्यांनी तरूणाला हॉटेलमध्ये मारहाण केल्यानंतर ते त्याला घेऊन हॉटेलच्या बाहेर आले आणि तेथे त्यांची पुन्हा त्याच्यावर चॉपरसह वेगवेगळ्या हत्यारांनी सपासप वार केले. या सीसीटीव्ही फुटेजमुळे जळगाव शहरामध्ये गुन्हेगारांची किती हिंमत वाढली आहे हे स्पष्ट होत असून पोलिसांच्या कारभारावर शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी प्रकरणी काही संशंयिताना ताब्यात घेतले असून इतर फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.