वडील दिवसभर राबून घ्यायचे, पण खर्चाला पैसे देत नव्हते, अखेर मुलांना संताप अनावर झाला अन्…
शेतात झोपलेल्या शेतकऱ्याची अज्ञात इसमांनी हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कसून तपास सुरु केला. मात्र तपासात जे उघड झालं ते पाहून सर्वच अवाक् झाले.
खेमचंद कुमावत, TV9 मराठी, जळगाव : वडिलांच्या त्रासाला कंटाळून मुलांनीच वडिलांचा काटा काढल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील चिंचखेड शिवारात घडली आहे. मेहुनबारे पोलिसांनी अवघ्या आठ तासात हत्याकांडाचा उलगडा करण्यास यश मिळवले आहे. चिंचखेड शिवारात राजेंद्र पाटील या शेतकऱ्याचा अज्ञात इसमांनी हत्या केल्याची घटना घडली होती. मयत राजेंद्र पाटील यांची हत्या त्यांची दोन्ही मुलं मुकेश पाटील आणि राकेश पाटील या दोघांनी केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास मेहुनबारे पोलीस करत आहेत.
शेतात झोपले असताना केली वडिलांची हत्या
रात्री नेहमीप्रमाणे शेतात झोपण्यासाठी गेलेले शेतकरी राजेंद्र सुखदेव पाटील यांची अज्ञात इसमानी हत्या केली. याप्रकरणी राजेंद्र यांचा मोठा मुलगा मुकेश राजेंद्र पाटील याने पोलीस ठाण्यात वडिलांच्या हत्येबाबत तक्रार दिली. मुलाच्या तक्रारीनुसार पोलिसांनी कलम 302 प्रमाणे अज्ञात इसमांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करत, घटनेचा तपास सुरू केला. तपासादरम्यान जे उघडकीस आले ते पाहून पोलिसही चक्रावून गेले. राजेंद्र पाटील यांची हत्या दुसऱ्या तिसऱ्या कुणी केली नसून, खुद्द त्यांच्या मुलांनीच केली आहे.
तपासात मुलांनी हत्या केल्याचे उघड
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता घटनास्थळी रक्ताने माखलेल्या लाकडी काठ्या, दोरी, कांदा चाळीचे तुटलेले कुलूप आणि तेथील कपाशीच्या अस्ताव्यस्त पडलेल्या गोण्या यांचे बारकाईने निरीक्षण केले असता हत्येचा बनाव केल्याचे दिसून आले. यानंतर पोलिसांनी राजेंद्र पाटील यांच्या दोन्ही मुलांची चौकशी केली असता त्यांच्या दोघांच्याही जबाबामध्ये विसंगती आढळून आली. यानंतर पोलिसांनी गावात चौकशी केली असता मयत शेतकरी आणि त्याच्या दोन्ही मुलांमध्ये वाद असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी दोन्ही मुलांची कसून चौकशी केली असता आपणच वडिलांची हत्या केल्याची कबुली मुलांनी दिली.
वडिलांच्या त्रासाला कंटाळून त्यांची हत्या
वडील आईकडून आणि आपल्याकडून शेतीची सर्व कामे करून घेत असत. काबाडकष्ट करून घेत, मात्र खर्चासाठी, कपड्यांसाठी किंवा वैद्यकीय उपचाराकरता कुठल्याही खर्चासाठी पैसे देत नसत. तसेच वडील आईला आणि आपल्याला शिवीगाळ करत मारहाणही करत असत. वडिलांच्या या त्रासाला कंटाळून मुलांनी वडिलांचा काटा काढण्याचे ठरवले.
त्याप्रमाणे 8 जून रोजी पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास वडील शेतामध्ये एकटे झोपले असताना दोन्ही मुलं मुकेश पाटील आणि राकेश पाटील यांनी वडिलांवर जीवघेणा हल्ला करत त्यांची हत्या केली. त्यानंतर वडिलांची कुणीतरी अज्ञात इसमाने हत्या केल्याचा बनाव केला. मात्र पोलिसांपुढे त्यांचा हा बनाव जास्त काळ टिकू शकला नाही आणि अखेर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. मेहुनबारे पोलीस या प्रकरणी अधिक सखोल तपास करत आहेत.