450 वर्ष जुनी जांब समर्थ येथील प्राचीन मूर्ती सापडली, चोरांनी कितीला विकलेली? उत्तर मिळालं!
तब्बल 2 महिन्यांनंतर चोरीप्रकरणी पोलीस तपासाला मोठं यश! मूर्ती सापडली, पण आव्हान अजूनही कायम, कारण काय?
जालना : 22 ऑगस्ट रोजी जालन्यातील जांब समर्थ (Jamb Samarth) येथील समर्थांच्या देवघरातील मूर्ती चोरीला (Statue Theft) गेल्या होत्या. या मूर्ती अखेर सापडल्या आहेत. तब्बल 2 महिन्यांनी या मूर्ती आणि मूर्तीची चोरी करणाऱ्या चोरांना (Jalana News) पकडण्यात यश आलंय. मात्र या चोरी प्रकरणातील प्रमुख आरोपी अजूनही फरार आहे. अटक करण्यात आलेल्या दोघा चोरांच्या चौकशीतून मुख्य आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातो आहे. सुरुवातीला जालना क्राईम ब्रांच या प्रकरणाचा तपास करत होती. पण नंतर हे प्रकरण एसआयटीकडे वर्ग करण्यात आलं होतं.
2 महिन्यांनी शोध
गेल्या दोन महिन्यांपासून पोलीस जांब समर्थ येथील मूर्ती चोरी प्रकरणाचा तपास करत होता. त्यानंतर या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन अखेर एका विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. एसआयटीच्या माध्यामातून चोरीप्रकरणाता तपास सुरु करण्यात आला होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक राज्यातून या चोरी प्रकरणातील दोघा आरोपांनी पथकाने अटक केलीय. मुख्य आरोपी अजूनही फरार आहे. त्याचा शोध घेतला जातो आहे.
कितीला विकली मूर्ती?
एसआयटीने केलेल्या तपासात चोरांनी ही मूर्ती चोरुन विकली होती. 25 हजार रुपयांना ही मूर्ती विकण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे. विकलेल्या मूर्ती आता पथकाने आपल्या ताब्यात घेतल्या आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून जालन्यातील या चोरी प्रकरणातील आरोपींना शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं. अखेर या चोरीचे महत्त्वपूर्ण धागेदोरे शोधण्यात पोलिसांना यश आलंय. लवकरच मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळण्यात येतील, असा विश्वास आता व्यक्त केला जातोय.
जांब समर्थ येथील समर्थांच्या देवघरातील हनुमानाच्या मूर्ती चोरीला गेल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, आता चोरीप्रकरणी तामिळनाडू पोलिसांची मदत घेऊन या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येणार असल्याचं कळतंय.
ही चोरी झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मूर्ती चोरी प्रकरणी गावकऱ्यांनी बातचीत करुन त्यांना आश्वस्त केलं होतं. मूर्ती चोरांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले होते.