जयंत पाटलांच्या सभेत मोबाईल चोरी, मुक्ताईनगरातून अट्टल चोरट्याला बेड्या
जळगावातील सराईत गुन्हेगार शंकर निकम याने जयंत पाटलांच्या सभेत पत्रकाराच्या मोबाईलवर हात साफ केला होता. (Jayant Patil Mobile Thief Muktainagar)
जळगाव : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या सभेत मोबाईलवर डल्ला मारणाऱ्या अट्टल चोरट्याला जळगावात अटक करण्यात आली आहे. गर्दीच्या ठिकाणी चोरी करणारा अट्टल गुन्हेगार शंकर मधुकर निकम मुक्ताईनगर पोलिसांच्या जाळ्यात सापडला. (Jayant Patil NCP Sanvad Yatra Mobile Thief arrested in Jalgaon Muktainagar)
फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रवादीची संवाद यात्रा
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मतदारसंघात 12 फेब्रुवारी 2021 रोजी राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. भुसावळ रोडवरील गोदावरी मंगल कार्यालयात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा तो पहिलाच जळगाव दौरा होता.
पत्रकाराच्या मोबाईलवर हात साफ
सभेत जळगावातील सराईत गुन्हेगार शंकर निकम याने पत्रकाराच्या मोबाईलवर हात साफ केला होता. मोबाईल चोरी झाल्याचं लक्षात आल्यानंतर पत्रकाराने मुक्ताईनगर पोलिसात तक्रार नोंदवली होती. दोन महिने मोबाईल स्वीच ऑफ असल्याने शोध घेण्यात पोलिसांना अडथळे येत होते. मात्र नवीन सीमकार्ड टाकून फोन ऑन करताच मोबाईलचा आणि चोरट्याचा तपास लागला.
मुक्ताईनगर आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शंकरला अटक केली. शंकर निकम हा जळगावातील गेंदालाल मिल भागातील रहिवासी आहे. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वीही त्याच्याविरोधात गुन्हे नोंदवण्यात आलो होते. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी त्याने केलेले चोरीचे आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार जाहीर?
रोहिणी खडसे खेवलकर यांचे जे नुकसान मागच्या निवडणुकीत आम्ही केलं, ते आगामी विधानसभा निवडणुकीत व्याजासकट भरुन काढू. 15 टक्के मताधिक्याने रोहिणी खडसेंना निवडून आणू. त्यासाठी संपूर्ण ताकद राष्ट्रवादी काँग्रेस उभी करेल, असं आश्वासन जयंत पाटील यांनी मुक्ताईनगरातील सभेत दिलं होतं. त्यामुळे एकप्रकारे एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे खेवलकर यांना आमदारकी देण्याचे संकेत राष्ट्रवादीने दिल्याचे मानले जाते.
संबंधित बातम्या :
रोहिणीताई, राष्ट्रवादीने तुमचं केलेलं नुकसान पुढील विधानसभेला व्याजासकट भरुन काढू : जयंत पाटील
खडसेंच्या राष्ट्रवादी एन्ट्रीनंतर जयंत पाटील यांचा पहिला जळगाव दौरा, भाजपला रोखण्याची रणनिती
(Jayant Patil NCP Sanvad Yatra Mobile Thief arrested in Jalgaon Muktainagar)