जेट एअरवेजचे संस्थापक न्यायालयासमोर भावूक, म्हणाले ‘आयुष्याची आशा गमावली, यापेक्षा…’
न्यायालयाच्या दैनंदिन सुनावणीची नोंदिनुसार नरेश गोयल यांनी त्यांची प्रकृती, पत्नीचे आजारपण, जे. जे. हॉस्पिटलला भेटी देणे अशा विविध समस्यांबाबत सविस्तर माहिती दिली. ते न्यायाधीशांना म्हणाले, 'मी खूप अशक्त झालो आहे आणि मला जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात काही अर्थ नाही.
मुंबई | 07 जानेवारी 2024 : कॅनरा बँकेतील 538 कोटी रुपयांच्या कथित फसवणुक प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना अटक केली आहे. गेल्या वर्षी 1 सप्टेंबर 2023 रोजी त्यांना अटक करण्यात आली. सध्या नरेश गोयल हे आर्थर रोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत. विशेष न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यासमोर त्यांनी जामीन अर्ज ही दाखल केला आहे. या बँक फसवणूक प्रकरणी ईडी न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले. यावेळी ते भावूक झाले होते. “जीवनाची सर्व आशा गमावली आहे” आणि “सध्याच्या स्थितीत जगण्यापेक्षा तुरुंगातच मरणे बरे” असे ते म्हणाले.
कॅनेरा बँकेने जेट एअरवेजला 848.86 कर्ज मंजूर केले होते. त्यातील 538.62 कोटी रुपयांचे कर्ज थकले आहे. बँकेने ईडीकडे केलेल्या तक्रारीनंतर ईडीने जेट एअरवेज (इंडिया) लिमिटेड विरोधात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक अधिनियम अंतगर्त कारवाई केली. ईडीने जेट एअरवेजची 538 कोटींची मालमत्ता जप्त केली. यात प्रामुख्याने 17 फ्लॅट, बंगले आणि व्यावसायिक मालमत्तांचा समावेश आहे. बँक कर्जाचा निधी जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या वैयक्तिक खर्चासाठी वापरण्यात आला असा आरोप ठेवत ईडीने त्यांना अटक केली होती.
नरेश गोयल यांना विशेष न्यायालयासमोर हजर केले. त्यावेळी त्यांनी ‘मी जीवनाची आशा गमावली आहे’ आणि जगण्यापेक्षा तुरुंगातच मरणे बरे होईल असे हताश उद्गार काढले. 70 वर्षीय गोयल यांनी पत्नी अनिता ही कर्करोगाच्या शेवटच्या टप्प्यात आहे. तिची खूप आठवण येत असल्याचे सांगितले. याच कार्यवाहीदरम्यान त्यांनी वैयक्तिक सुनावणीची विनंती केली. जी न्यायाधीशांनी मान्य केली.
न्यायालयाच्या दैनंदिन सुनावणीची नोंदिनुसार नरेश गोयल यांनी त्यांची प्रकृती, पत्नीचे आजारपण, जे. जे. हॉस्पिटलला भेटी देणे अशा विविध समस्यांबाबत सविस्तर माहिती दिली. ते न्यायाधीशांना म्हणाले, ‘मी खूप अशक्त झालो आहे आणि मला जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात काही अर्थ नाही. आर्थर रोड तुरुंगातून इतर कैद्यांसह हॉस्पिटलपर्यंतचा प्रवास खूप त्रासदायक आणि कंटाळवाणा आहे. जो मला सहन होत नाही. नेहमी रुग्णांची लांबच लांब रांग असते आणि डॉक्टरांपर्यंत वेळेवर पोहोचता येत नाही. जेव्हा जेव्हा डॉक्टर माझी तपासणी करतात तेव्हा पुढील पाठपुरावा करणे शक्य नसते. त्याचा माझ्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होत आहे असे त्यांनी सांगितले.
माझी पत्नी अनिता कर्करोगाच्या अखेरच्या अवस्थेत आहेत. तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिची काळजी घेणारे कोणी नाही. कारण, एकुलती एक मुलगीही आरोग्याच्या समस्येने त्रस्त आहे. गुडघे सुजले आहेत. भयानक वेदना होतात. लघवी करताना तीव्र वेदना होतात. कधी कधी असह्य वेदनांसह लघवीतून रक्त येते. बहुतेक वेळा मदत मिळत नाही. कारण, तुरुंग कर्मचाऱ्यांच्याही मदत करण्याला काही मर्यादा आहेत. त्यामुळे मला जे. जे. रुग्णालयात पाठवू नका, त्याऐवजी मला तुरुंगातच मरू द्या. मी आयुष्याची प्रत्येक आशा गमावली आहे आणि अशा परिस्थितीत जगण्यापेक्षा मरणे चांगले आहे असे ते म्हणाले.
न्यायाधीश यांनी त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले. जेव्हा ते आपले मत मांडत होते तेव्हा त्यांचे शरीर थरथरत होते. त्यांना उभे राहण्यासाठी आधाराची गरज आहे असे निरीक्षण न्यायाधीश यांनी केले. त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा विचार केला आहे. आरोपीला निराधार ठेवणार नाही. त्याच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी शक्य ती सर्व काळजी आणि उपचार केले जातील असे न्यायाधीश यांनी दिले. तसेच, न्यायालयाने त्यांच्या वकिलांना प्रकृतीबाबत योग्य ती पावले उचलण्याचे निर्देश दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 16 जानेवारीला होणार आहे.