चावी लावायच्या आधीच धक्क्याने खुलले लॉकर, बॅंक ऑफ बडोदामधून दीड कोटींचे दागिने गायब
आतापर्यंत बॅंकेला सुरक्षित मानले जात होते. परंतू बॅंकेचे लॉकरकापून तब्बल दीड कोटीचे दागिने चोरीला गेल्याची धक्कादायक घटना कुठे घडली जाणून घ्या...
लखनऊ : घरात दागिने ठेवले तर चोरीला जाण्याची भिती असते म्हणून अनेक जण बॅंकेतील लॉकरमध्ये आपले दागिने ठेवणे सुरक्षित मानत असतात, परंतू तेथूनही दागिन्यांची चोरी होत असेल तर त्याला काय म्हणावे ? सर्वाधिक सुरक्षित मानल्या जाणाऱ्या बॅंकेतूनच दागिन्यांची चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमधील किडवई नगरातील बॅंक ऑफ बडोदामधून दीड कोटीचे दागिन्यांची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
नौबस्ता बसंत विहारचे राहणारे सूर्य कुमार अवस्थी ऑर्डीनन्स फॅक्टरीमधून निवृत्त झाले आहेत. त्यांनी पत्नी रामा अवस्थी यांचे किडवई नगरातील के – ब्लॉक स्थित बॅंक ऑफ बडोदामध्ये खाते आणि लॉकर आहे. रामा या आपली मुलगी श्रद्धा सोबत शुक्रवारी बॅंकेत गेल्या असता त्यांना धक्काच बसला. त्यांचा हात लागताच लॉकर आपोआप उघडले गेले. त्यानंतर त्यांनी लॉकर तपासले तर आतील दागिने गायब झाले होते. जवळपास दीड कोटी रूपयांचे त्यांचे दागिने चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. या दागिन्यांची चोरी करण्यासाठी लॉकरला कापण्यात आले होते असे उघडकीस आले आहे.
पोलीस लागले कामाला
रामा यांची कन्या श्रद्धा हीने लॉकरमधील दागिने गायब झाल्याचे समजताच आपल्या कुटुंबातील सदस्यांना आणि नौबस्ता पोलिसांना कळविले. त्यानंतर नौबस्ता पोलिस त्यांच्या फोरेन्सिक टीम सोबत घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी पोहचली. घटनास्थळी लॉकरच्या खाली रिकामी पर्स अन्य काही सामान देखील सापडले. त्यामुळे हे लॉकर कापून ही चोरी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एसीपी अभिषेक पांडे यांनी सांगितले की बॅंकेच्या लॉकरजवळ आरोपीच्या हाताचे ठसे सापडतात का याची पाहणी केली जात आहे. पीडीत व्यक्तीच्या जबानी आधारे आरोपी बॅंक प्रशासनाविरोधात एफआयआर दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली असल्याची माहीती त्यांनी दिली आहे.
वर्षभरातील तिसरी घटना
अशा प्रकारे बॅंकेच्या लॉकरमधून मुल्यवान ऐवज चोरी होण्याची ही तिसरी घटना असल्याचे म्हटले जात आहे. या पूर्वी फिलखाना क्षेत्रातील सेंट्रल बॅंकेच्या लॉकरमधून 12 हून अधिक लोकांचे दागिने चोरीला गेले होते. त्यानंतर सेंट्रल बॅंक कमिटीने सर्व ग्राहकांचे दागिन्यांच्या मुल्याची रक्कम ग्राहकांना परत केली होती. त्यानंतर कानपूरच्या आणखी एका बॅंकेच्या लॉकरमधून दागिने चोरी झाल्याची घटना उघडकीस आली होती.