जळगाव / 10 ऑग्सट 2023 : जळगावातील बालिका हत्याकांड प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केल्याप्रकरणी पत्रकार संदीप महाजन यांना अज्ञातांनी मारहाण केल्याची घटना जळगावमध्ये घडली आहे. मात्र आमदार किशोर पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप पत्रकरा महाजन यांनी केला आहे. दरम्यान, आपल्यावर किशोर पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी कितीही हल्ले झाले तरी आपण आपला लढा सुरुच ठेवणार असल्याचं संदीप महाजन यांनी म्हटलं आहे. या मारहाणीत महाजन किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी महाजन यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याआधी महाजन यांना फोनवरुन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असतानाच ही मारहाणीची घटना घडली.
जळगावमधील पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांच्या मतदारसंघात 8 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार आणि हत्येची घटना घडली होती. या घटनेप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित कुटुंबाशी फोनवरुन संवाद साधत त्यांचे सांत्वन केले होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या सांत्वनाबाबत पत्रकार संदीप महाजन यांनी त्यांच्यावर टीका केली होती. यानंतर किशोर पाटील यांनी महाजन यांना फोनवरवरुन शिवीगाळ केली होती.
पाचोऱ्याला सुसंस्कृत राजकारणाचा इतिहास तो आमदारांनी जपावा, मतदार हे लोकप्रतिनिधीचे अनुकरण करतात, असे सांगत पत्रकार मारहाण प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी आमदार भावावर भडकल्या आहेत. आमदार किशोर पाटलांच्या व्हायरल क्लिपवरून बहीण वैशाली सूर्यवंशी संतप्त झाल्या आहेत. यामुळे त्यांनी शिंदे गटाचे आमदार आणि भाऊ किशोर पाटलांचे कान टोचले आहेत. ही गुंडगिरी खपवून घेणार नाही, असाही टोला वैशाली सूर्यवंशी यांनी आमदार किशोर पाटील यांचं नाव न घेता हाणला आहे. यापुढे उद्धव ठाकरेंवरही टीका कराल तर खबरदार असा इशाराही पुढे वैशाली सूर्यवंशी यांनी दिला.