Kalyan Crime : आता घरातही नागरिक असुरक्षित ? घरात घुसून विवाहीत महिलेवर हल्ला, हादरलं शहर
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे शहरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी खडकपाडा पोलीसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कल्याण | 9 ऑक्टोबर 2023 : कल्याण डोंबिवली परिसरात गुन्हेगारी (crime in Kalyan Dombivli) मोठ्या प्रमाणात वाढली दिवसाढवळ्याही गुन्हे घडत आहेत. आता लोकांचं घरात राहणंही मुश्किल झालेलं आहे कारण गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. अशीच एक धक्कादायक घटना कल्यण पश्चिम येथे घडली आहे. घरात घुसून एका विवाहीत महिलेवर चाकूने जीवघेणा वार (crime news) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
दिवसाढवळ्या झालेल्या या घटनेने शहरात एकच खळबळ माजली असून नागरिकांच्या, विशेषत: महिला वर्गाच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. या घटनेत जखमी झालेल्या महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खडकपाडा पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून ते आरोपीचा कसून शोध घेत आहेत.
नेमकं काय घडलं ?
कल्याण खडकपाडा परिसरात राहणाऱ्या नितेश पाल नावाच्या इसमाने व्यक्तीने नऊ महिने आधी उत्तर प्रदेश मधील २० वर्षीय तरूणीशी लग्न केले. ते दोघेही कल्याण पश्चिमेतील कोळीवाडा रोड परिसरात राहतात. नितेश याची बेकरी असून त्याच्या कामासाठी त्याला वेळी-अवेळी बाहेर जावे लागते. काल संध्याकाळी नितेश बेकरीच्या कामासाठी बाहेर गेला तेव्हा त्याची पत्नी घरात एकटीच होती. तेव्हा एका अज्ञात इसमाने खिडकीतून घरात प्रवेश केला व तिच्या गळ्यावर आणि तळहातावर चाकूने सपासप वार केले. यामध्ये नितेशची पत्नी गंबीर जखमी झाली व मदतीसाठी ओरडून लागली.
तिचा आवाज ऐकून आजूबाजूच्यांनी धाव घेतली . तुझ्या पत्नीला कोणीतरी मारहाण करत आहे, असे सांगत काही लोकांनी नितेशला त्याच्या पत्नीवरील हल्ल्याची माहिती दिली. तोही धावतपळत घरी आला तोपर्यंत हल्लेखोर फरार झाला होता. मात्र त्याची पत्नी ही जमीनीवर जखमी अवस्थेत पडली होती. बराच रक्तस्त्रावही झाला होता. नितेशने पत्नीला उचलून उपचारांसाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. गंची प्रकृती सध्या गंभीर असून उपचार सुरू आहेत. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दोन ते तीन विविध पथकं तयार करत पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. मात्र अशा प्रकारे घरात घुसून घडलेल्या या हल्ल्यामुळे परिसरातील राहणाऱ्या महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिक परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.