सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कल्याण | 29 जानेवारी 2024 : कल्याणमधील गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांनी सामान्य लोकांचं जगणं त्रस्त झालं आहे. कुठे चोरी, पाकिटमारी, तर कुठे घरफोडी.. गुन्ह्यांच्या घटना तर वाढतच चालल्या आहेत. त्याचवेळी कल्याण शहरातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
कल्याण स्टेशन परिसरात गर्दीत घुसून प्रवाशांच्या बॅगा लांबवणाऱ्या एका चोराला पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद फिरोज असे आरोपीचे नाव असून तो त्याच्या सख्ख्या भावासोबत चोरीचे हे उद्योग करायचा. कल्याण स्टेशनवर बॅग बाजूला ठेवून तिकीट काढणाऱ्या प्रवाशांच्या बॅगा लंपास करून हे दोघे पसार व्हायचे. त्यांच्याविरोधात मुंबई नवी मुंबई सह ठाणे जिल्ह्यात चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत .
सध्या पोलिसांनी मोहम्मद फिरोजला ताब्यात घेत त्याच्याकडनं चार गुन्हे उघडकिस आणत मोबाईल सह इतर वस्तू जप्त केल्या आहेत. तर त्याचा सख्खा भाऊ मोहम्मद नसरुल याला पकडण्यासाठी विविध पथक तयार करत त्याचा शोध सुरू केला आहे
बिहारवरून मुंबईला कामासाठी आले पण…
मोहम्मद फिरोज मन्सुरी आणि त्याचा सख्खा भाऊ मोहम्मद नसरुल मन्सुरी हे दोघे 2016 साली बिहारवरून मुंबईत काम करण्यासाठी आले. पण कामाला न लागता त्यांनी वेगळेच उद्योग सुरू केले. बांद्रा आणि नवी मुंबई स्टेशन परिसरात तिकीट काढण्याच्या घाईत असलेल्या प्रवाशांच्या बॅगा चोरण्यास सुरवात केली. त्यात कधी पैसे तर कधी दागिने , मौल्यवान वस्तू मिळू लागल्याने दोघांनी नंतर मुंबई ,नवी मुंबई सह ठाणे जिल्ह्यातील मुख्य स्टेशन टार्गेट करत आपला चोरीचा व्यवसाय सुरू केला.
गेली अनेक वर्ष ते चोरीचाच हा उद्योग करत आहेत. अशाच प्रकारे काही दिवसांपूर्वी कल्याण रेल्वे स्थानकातील बुकिंग ऑफिस मध्ये एक व्यक्ती तिकीट काढत असताना संधीचा फायदा घेत मोहम्मद फिरोज मन्सुरी हा त्या व्यक्तीची बॅग घेऊन पसार झाला होता. त्यानंतर चोरीची तक्रार दाखल करण्यात आली असात कल्याण जीआरपी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांही हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस अंमलदार एल कुटे , मोहिते ,वाघ,पाटील याचे एक पथक तयार केले. या पथकाने बातमीदार आणि सीसीटीव्हीच्या मदतीने स्टेशन परिसरात सापळा रचून मोहम्मद फिरोज मन्सुलारी अटक केली. तर त्याच्या भावाचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. पोलिसांच्या माहिती नुसार या दोघा वर 14 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असून अटकेत असलेल्या आरोपी मोहम्मद फिरोज याने 4 गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून 22 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी सध्या पोलीस अधिक तपास करत आहेत.