कल्याणमध्ये पुन्हा हाणामारी, लोखंडी रॉडने कुटुंबाला मारहाण, एक जण गंभीर
कामना नगर परिसरातील चाळीत पाच ते सहा जणांच्या टोळीने एका कुटुंबाला जबर मारहाण केली. लोखंडी रॉड आणि लाकडी दांड्यांनी या कुटुंबाला मारहाण करण्यात आली.
कल्याणमध्ये काही दिवसांपूर्वी एका मराठी कुटुंबावर अमराठी माणसाने अमानुष हल्ला करण्यात आला. धूप-अगरबत्ती लावण्यावरुन हा किरकोळ वाद सुरु झाला. त्यानंतर या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. एका परप्रांतीय कुटुंबाने बाहेरुन गुंड आणून कारण नसताना लोखंडी रॉडने मराठी कुटुंबाला मारहाण केली. या हल्ल्यामुळे एका तरुणाच्या डोक्यात तब्बल 10 टाके पडले. कल्याण पश्चिमेला असलेल्या योगीधाम परिसरातील अजमेरा हाईट्स या उच्चभ्रू सोसायटीत बुधवारी रात्री हा सर्व धक्कादायक प्रकार घडला. या घटनेचे पडसाद राजकीय क्षेत्रातही उमटले. यावरुन राजकारण तापलेले असताना दुसरीकडे कल्याणमध्ये पुन्हा एकदा हाणामारीची घटना घडली.
कल्याण पूर्वमधील कटेमांवली कामना नगर परिसरातील चाळीत पाच ते सहा जणांच्या टोळीने एका कुटुंबाला जबर मारहाण केली. लोखंडी रॉड आणि लाकडी दांड्यांनी या कुटुंबाला मारहाण करण्यात आली. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद करण्यात आली.
नेमकं काय घडलं?
कल्याण पूर्वमधील कटेमावली परिसरात कामना नगर परिसरात असलेल्या चाळीत मोठा राडा झाला. काल रात्री नऊच्या सुमारास 5 ते 6 जणांच्या टोळीने घरात घुसून लोखंडी रॉड आणि लाकडी दांड्यांनी मारहाण केली. या चाळीत गेल्या कित्येक वर्षांपासून राम दुबे यांचे कुटुंब राहत आहे. राम दुबे यांच्या कुटुंबाचा एका नातेवाईकाशी काही दिवसांपूर्वी वाद झाला. या वादाचा राग मनात ठेवून त्या नातेवाईकाने दुबे यांच्या घरावर हल्ला केला. यावेळी त्याने काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनाही सोबत घेतले होते. काल रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली.
या घटनेचा सीसीटीव्हीही समोर आला आहे. यात एक माणूस तोंडाला रुमाल लावून हातात दांडका घेऊन दुबे यांच्या घरात चालत येताना दिसत आहे. त्याच्या पाठोपाठ काही जण हातात शस्त्र घेऊन धावत दुबेंच्या घरात शिरतात. दुबे यांना काही कळण्याच्या आतच त्याच्या घरात घुसून मारहाण करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. यानंतर हे हल्लेखोर पळून जातात, असा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
पोलिसात तक्रार दाखल
दरम्यान या घटनेनंतर कल्याण कोळशेवाडी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. त्यानंतर सध्या पोलिस या टोळीचा शोध घेत आहेत. मात्र या घटनेनंतर कल्याणमध्ये खुलेआम हल्ला होत असल्याने गुन्हेगारांची दहशत दिवसेंदिवस वाढत असल्याचा प्रकार घडत आहे. या घटनेनंतर सध्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. मारहाण करणारे हल्लेखोर नेमके कोण होते, हे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ओळखण्याचे काम सुरू केले आहे.