कल्याण : आजकाल कोण कुणाची कशी फसवणूक करेल याचा काही नेम नाही. एक्सप्रेस गाडीचे इंजिन चालविताना व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर व्हिडीओ टाकत रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घातल्याचे उघडकीस आली आहे. या घटनेत एका महाठगाने थेट व्हिडीओच दाखवत मोटरमन असल्याची बतावणी केली. आधी व्हिडीओ दाखवायचा मग विश्वास संपादन करायचा. ही आयडिया वापरून त्याने अनेकांची फसवणूक केली आहे.
याप्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. उमाशंकर बर्मा असे या भामट्याचे नाव असून, तो मूळचा उत्तर प्रदेशचा राहणारा आहे. बर्माने अजून किती जणांना फसवले याचा तपास पोलीस करत असून, त्याच्या अन्य दोन साथीदारांचा शोध सुरू केला आहे.
कल्याण पूर्व भागात राहणारे राजेंद्र जैन यांच्या पत्नीला नोकरीची गरज होती. आपल्या पत्नीसाठी ते सोशल मीडियापासून पेपरमध्ये नोकरीच्या जाहिरात शोधत होते. याच दरम्यान ते सोशल मीडियाच्या माध्यमातून उमाशंकर बर्मा यांच्या संपर्कात आले.
बर्मा याने सोशल मीडियावर मेल एक्सप्रेस गाडीचे इंजिन चालवितानाचा व्हिडीओ टाकला होता. त्या व्हिडीओसोबत त्याने रेल्वेत नोकरी हवी असल्यास ती मिळवून दिली जाईल, असा मेसेजही पोस्ट केला होता.
यानंतर कामाच्या शोधात असलेल्या जैन यांनी बर्माला आपल्या पत्नीला नोकरीची गरज असल्याचे सांगितले. रेल्वेत नोकरी लावण्याच्या बदल्यात 21 लाख रुपये दिले. पैसे दिल्यावर बर्माच्या पत्नीला नोकरी काही लागली नाही.
मात्र अनेक दिवस नोकरी लागली नसल्याने अखेर जैन यांनी बर्माकडे पैसे परत करण्यासाठी तगादा लावला. मात्र बर्मा त्यांना प्रतिसाद न देता उडवाउडवीची उत्तर देत असल्याने कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात उमाशंकर बर्माच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
सध्या पोलिसांनी आरोपीला आपल्या ताब्यात घेत बर्मा याने अशा प्रकारे अन्य किती जणांना रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली याचा तपास करीत आहेत.