कल्याण रेल्वे स्टेशनवर डेक्कन क्वीनमध्ये अपघात, एकाचा मृत्यू तर एक जखमी
डेक्कन क्वीन कल्याण रेल्वे स्टेशनजवळ पोचत असतानाच हा अपघात झाला. स्टेशनवरील हमालांनी दोघांनाही जवळच्या रुग्णालयात दाखल केले. रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे.
सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कल्याण | 6 ऑक्टोबर : चालत्या ट्रेनमध्ये दरवाजात बसून प्रवास करणे हे खूप धोक्याचे आहे . रेल्वे प्रशासनातर्फे वारंवार याची सूचना देऊन काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. पण प्रवासी त्याकडे पुरेसे लक्ष देत नाहीत आणि दुर्घटना घडून जीवावर बेतू शकते. असाच एक दुर्दैवी प्रकार कल्याण रेल्वे स्टेशनवर घडला आहे. डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमधून खाली पडल्याने एका तरूणाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना घडल्याचे समोर आले. आज (शुक्रवार) सकाळी हा अपघात घडला.
मुंबईवरून निघालेल्या डेक्कन क्वीनमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती. त्यापैकी दोन तरूण हे ट्रेनच्या दरवाज्यात बसले होते. ही ट्रेन कल्याणमध्ये थांबत नाही. ट्रेन कल्याण स्टेशनवरून जात असताना दोन तरुणांनी चालत्या ट्रेनमधूनच खाली उतरण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये दोघेही तोल जाऊन खाली पडले आणि गंभीर अपघात झाला.
या दुर्दैवी घटनेनंतर स्टेशनवरील हमालांनी मदतीसाठी धाव घेतली आणि त्या तरूणांना उपचारांसाठी तातडीने रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले. या घटनेत एकाच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हे दोन्ही तरूण भाऊ असल्याचे समजते.
रेल्वे पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.