Kalyan Crime : दांडिया खेळताना वाद, तिघांची तरूणाला बेदम मारहाण, केला जीवघेणा हल्ला ….
धक्का लागल्याच्या वादातून तरूणाने त्याला जाब विचारला असता त्याने व त्याच्या मित्रांनी थेट मारहाण करण्यास सुरूवात केली. नंतर त्याच्यावर धारदार शस्त्राने वारही केले.

कल्याण | 25 ऑक्टोबर 2023 : विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण काल मोठ्या उत्साहात सर्वत्र पार पडला. त्यापूर्वी नवरात्रीचे नऊ दिवस सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते. अनेक ठिकाणी गरबा, दांडियाचेही (dandiya programme) आयोजन करण्यात आले होते. अनेक ठिकाणी तरूण-तरूणी, नागरिक धूमधडाक्यात दांडिया खएळत होते. सर्वांनीच सणाचा आनंद लुटला. मात्र याच सणाच्या उत्साहाला गालबोट लागल्याची एक घटना कल्याणमध्ये घडल्याचे समोर आले.
तेथे एक मुलगा त्याच्या बहिणीसोबत दांडिया खेळायला गेला होता. मात्र त्या दरम्यान त्याच्या बहिणीला काही तरूणांनी धक्का मारला. त्याचा जाब विचारायला गेलेल्या त्या तरूणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. याप्रकरणी कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा कसून शोध घेण्यात येत आहे.
जाब विचारला म्हणून केला हल्ला
कल्याण पूर्वेकडील नेतिवली भागात हा गुन्हा घडला. तेथील प्रबोधकार ठाकरे शाळेच्या मैदानात गरब्याचे आयोजन करण्यात आले. २३ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास मंजुमील शेख हा मुलगा त्याच्या बहिणीसह (वय १७) दांडिया खेळायला आला होता. खेळता खेळता एका टवाळखोराने त्याच्या बहिणीला जोरात धक्का दिला. हे पाहून मंजुमील संतापला आणि त्याने त्या टवाळखोर तरूणाला याचा जाब विचारला. आजूबाजूला दांडिया सुरू असतानाच त्या दोघांमध्ये मोठा वाद पेटला. पण काही क्षणांतच तो वाद विकोपाला गेला आणि तो मुलगा आणि त्याच्या टवाळखोर मित्रांनी मंजुमील याला बेदम चोप देण्यास सुरूवात केली.
भाऊ संकटात सापडल्याचे पाहून त्याची बहीण त्याला वाचवण्यासाठी पुढे धावली, पण त्या टोळक्यातील एक मुलाने तिला बाजूला धक्का दिला, तिचे केस जोरात ओढून जमीनीवर ढकलून दिले. तर त्या हल्लेखोरांपैकी दुसऱ्याने एक चाकू काढून मंजुमील याच्यावर वार केले, त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. मात्र हे पाहून गरब्याच्या त्या कार्यक्रमातील इतर सहभागी घाबरले आणि एकच गोंधळ उडाला, पळापळ झाली. याच गोष्टीचा फायदा घेऊन ते तिघेही हल्लखोरे तेथून पळून गेले.
त्यानंतर जखमी अवस्थेतील मंजुमील याला त्याच्या मित्रांनी उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर हत्याराने जेथे वार करण्यात आला तेथे १७ टाके पडले असून त्याचा एक पाय फ्रॅक्चरही झाल्याची माहिती मिळाली आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.
पोलिसांनी दाखल केला गुन्हा
दरम्यान जखमी मंजुमील शेख याच्या तक्रारीनंतर कोळसेवाडी पोलीस ठाण्यात टवाळखोर त्रिकुटावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याचे सांगत जखमी मंजुमीलने तपासाबद्दल सवाल उपस्थित केला आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.